चक्रीवादळ व अवकाळीने झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून त्वरित भरपाई द्या…! *रविकांत तुपकर यांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन…!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना चक्रीवादळ अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने पुन्हा एकदा जबर फटका दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बी पीक, भाजीपाला तसेच फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे.
 गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांनी पिसून निघत आहे. गेल्या खरीप हंगामात पावसात खंड पडल्याने उत्पादनात मोठी घट आली आहे. 
  जो काही शेतमाल शेतकऱ्यांच्या हाती आला त्या मालाला भाव नसल्याने लागवडीचा खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामात आपल्या पदरी काही पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु निसर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर सूड उगवला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळीवारा, चक्रीवादळ यामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, मका तसेच भाजीपाला आणि फळबागांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे उभी पिके जमीन दोस्त झाली आहेत तर फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे ज्वारी, मका, गहू व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस चक्रीवादळ आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या रंगी हंगामांकडून असलेल्या अपेक्षांवर पूर्णपणे पाणी फेरले आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. अशावेळी शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस चक्रीवादळ व ढगाळ वातावरणामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्वे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एका निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी आज तीन एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले.