व्यंकटगिरीवर ब्रह्मोत्सवाच्या तयारीला सुरुवात;५ ते ८ डिसेंबर दरम्यान रंगणार सोहळा...
Nov 30, 2024, 13:12 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजुर घाटातील व्यंकटगिरी पर्वतावर निसर्गरम्य वातावरणात श्री बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ डिसेंबर पासून या ब्रह्मोत्सव उत्सवाची सुरुवात होणार असून ८ डिसेंबर रोजी सांगता होणार आहे. बालाजी सेवा समिती आणि बालाजी मंदिर संस्थांच्या वतीने या ब्रह्मोत्सवाची जय्यत तयारी केली जात आहे. तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भजन संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बालाजी सेवा समिती आणि बालाजी मंदिर संस्थांच्या वतीने व्यंकटगिरी पर्वतावरील बालाजी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव उत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ब्रह्मोत्सवाचे यंदा चौदावे वर्ष आहे. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी विधिवत पूजा आणि होम हवन करून ब्रह्मोत्सवाची सुरुवात होणार आहे. ६ व ७ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत भजन संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर ८ डिसेंबर रोजी भागवत रसिक ह भ प शिवराज महाराज पवार शास्त्री यांचे सकाळी ११ते १ या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे व त्यानंतर दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप होणार आहे. या ब्रह्मोत्सवातील विशेष आकर्षण असणारा कल्याणॊत्सव अर्थात श्रीदेवी, भूदेवी सोबत श्री बालाजींचा विवाह सोहळा 7 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे तर ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री बालाजी १०८ कलशाभिषेक होणार आहे.
या ब्रह्मोत्सवा दरम्यान तिनही दिवस सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत भागवत प्रार्थना, यजमान संकल्प, कुंभ आवाहन, अग्नी प्रविष्ठा आणि तीर्थप्रसाद तर सायंकाळी ५ ते ८ या वेळेत यजमान संकल्प, रक्षाबंधन, हवन आणि तीर्थप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. ब्रह्मोत्सवाच्या या तीनही दिवस होणाऱ्या कार्यक्रमांचा तसेच ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या महाप्रसादाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बालाजी सेवा समिती आणि बालाजी मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.