प्रेमलता सोनोनेंचा अर्ज कायम! आ.संजय गायकवाडांची डोकेदुखी वाढली! प्रेमलता सोनोने म्हणतात, ही लढाई सर्वसामान्यांच्या अस्तित्वाची; जिंकण्यासाठीच भरला उमेदवारी अर्ज...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून शिवसेना नेत्या प्रेमलता सोनोने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न सुरू होते मात्र त्या प्रयत्नांना अपयश आले असून प्रेमलता सोनोने यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे. प्रेमलता सोनोने यांचे शिवसेना नेत्यांशी अतिशय जवळचे संबंध आहेत, शिवाय मतदार संघात त्यांनी अस्तित्व संघटनेच्या माध्यमातून केलेले सामाजिक काम यामुळे त्यांची चांगली ओळख आहे.. "आपला अर्ज माघार घेण्यासाठी नव्हताच, हा अर्ज निवडणुकीत विजयी होण्यासाठीच दाखल केलेला आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची लढाई सर्वसामान्यांच्या अस्तित्वाची आहे." अशी प्रतिक्रिया प्रेमलता सोनोने यांनी दिली आहे. दरम्यान प्रेमलता सोनोने यांच्या बंडखोरीमुळे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत...

बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मूलभूत सुविधांची वाणवा आहे. सौंदर्यीकरण म्हणजे विकास नव्हे, आधी मूलभूत प्रश्न महत्वाचे आहेत अशा शब्दात प्रेमलता सोनोने यांनी आ.गायकवाड यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला.

बुलडाणा विधानसभा मतदारसंघात सिंचनाचे प्रश्न आहेत, व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढते आहे, विशेष म्हणजे व्यसनाधीनता वाढवण्यासाठी कोण कारणीभूत ठरत आहे हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे त्या म्हणाल्या. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण आणि सर्वव्यापी, सर्वस्पर्शी विकास करण्याचे ध्येय ठेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे त्या म्हणाल्या.