

BREAKING स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर तर खंडणीखोर निघाले?
जिगाव प्रकल्पातून जास्तीचा मोबदला मिळवून देतो म्हणत शेतकऱ्यांना मागितली खंडणी; शेगाव शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल! पोलिसांनी केली डिक्कर यांना अटक
Mar 21, 2025, 20:50 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वराज्य पक्षाकडून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवलेल्या प्रशांत डिक्कर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. आज,२१ मार्चला सायंकाळी हा गुन्हा दाखल झाला. जिगाव प्रकल्पातून प्रति एकरी ४० लाख रुपये मोबदला मिळवून देतो, मात्र त्यासाठी मला पैसे द्या अशी मागणी डिक्कर यांनी केली होती. आठ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी डिक्कर यांना ५ लाख रुपये दिले होते..आज शेतकऱ्यांनी डिक्कर यांना पैसे परत मागितले असता डिक्कर यांनी नकार देत जीवनीशी मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा लाभ मिळवून देण्यासाठी ५ लाख प्रति एकरी द्या नाहीतर तुमच्या विरोधात आंदोलन करीन अशी धमकी दिल्याची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ येथील शेतकरी पुष्पा संदीप मोरखडे यांनी ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी डिक्कर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे..
प्रशांत डेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेली विधानसभा निवडणूक त्यांनी स्वराज्य पक्षाकडून लढवली होती. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या नेत्यावरच शेतकऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिगाव या महत्वकांशी प्रकल्पात इटखेड गावठाण पुनर्वसन करण्याकरता हिंगणा कवठळ येथील शेती भूसंपादन करण्याची प्रक्रिया व जमिनीचे मूल्यांकन ठरवण्याची प्रकिया शासनाकडून सुरू आहे सुरू आहे. दरम्यान या जमिनीचा प्रति एकरी ४० लाख रुपये मोबदला मिळवून देतो , त्यासाठी मी संघटनेच्या नावाने शासनाच्या विरोधात आंदोलन करतो. यासाठी तुम्ही मला पैसे द्या अशी मागणी शेतकऱ्यांकडे डिक्कर यांनी केल्याचा आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे. प्रशांत डिक्कर हा नावाजलेला नेता असल्याने हिंगणा कवठळ येतील गट नंबर ७७ मधील शेतकऱ्यांनी ८ दिवसांपूर्वी ५ लाख रुपये डिक्कर यांना दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान आज, २१ मार्चला प्रशांत डिक्कर जिगाव प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यासाठी शेगावला जात असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार हिंगणा कवठळ येथील तक्रारदारासह चार ते पाच शेतकरी शेगावात येऊन डिक्कर यांना भेटले. त्यावेळी 'मी तुम्हाला प्रति एकरी ४० लाख रुपये मोबदला मिळावा म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन करण्यासाठी जात आहे, मात्र त्यासाठी तुम्ही प्रति एकरी पाच लाख रुपये मला द्या" अशी मागणी डिक्कर यांनी शेतकऱ्यांना केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही रक्कम जास्त वाटल्याने शेतकऱ्यांनी नकार दिला, त्यावेळी "तुम्ही जर प्रति एकरी पाच लाख रुपये दिले नाही तर मी तुमच्या विरोधात आंदोलन करुन तुम्हाला शासनाकडून पैसे भेटू देणार नाही" अशी धमकी डिक्कर यांनी दिल्याचा आरोपही पोलिसात दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान त्यानंतर शेतकऱ्यांनी डिक्कर यांना आधी दिलेले ५ लाख रुपये परत मागितले असता " मी तुमचे पैसे परत देऊ शकत नाही, मी तुमचे काम करून देतो, परंतु मला अडचणीत आणून याबद्दल कुणाला सांगितल्यास माझ्या कार्यकर्त्यांकडून तुम्हाला जीवानिशी ठार मारून गायब करून टाकीन" अशी धमकी डिक्कर यांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान या प्रकारानंतर प्रशांत डिक्कर हा आपल्या विरोधात आंदोलन करेल या भीतीने तक्रारदार शेतकरी जिगाव प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा तिथे प्रशांत डिक्कर कार्यकर्त्यांसह हजर होते. आपल्या विरोधात आंदोलन करू नका अशी विनवणी शेतकऱ्यांनी केली, परंतु डिक्कर यांनी काहीही ऐकून घेतले नाही. डिक्कर यांनी वाद घालून भांडण तंटा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणानंतर शेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी डिक्कर व शेतकऱ्यांना पोलिस ठाण्यात आणले..त्यानंतर शेतकऱ्यांनी डिक्कर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
जिगाव प्रकल्प कार्यालयात लोटपोट..
दरम्यान त्याआधी जिगाव प्रकल्प कार्यालयात डिक्कर आणि तक्रारदार शेतकऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. डिक्कर यांना शेतकऱ्यांनी लोटपोट केली, बैठकीतून हाकलून लावण्याचा देखील प्रयत्न केला..