प्रकाश आंबेडकर आज मेहकरात! डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारार्थ घेणार जाहीर सभा! आंबेडकरांच्या भाषणाकडे जिल्ह्याचे लक्ष...! डॉ. ऋतुजा चव्हाणांना मिळणार बळ...
Nov 11, 2024, 08:14 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):विधानसभा निवडणुकीतील मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडी व क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजाताई ऋषांक चव्हाण यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा मेहकर येथील यशवंत मैदान, नगरपरिषद आज ११ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी डॉ. ऋतुजा चव्हाण व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, आंबेडकर काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांना मतदारसंघातून जोरदार पाठिंबा मिळत असून, त्यांच्या गावभेट दौर्यांतून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, तरूण, महिला अशा सर्वच घटकांनी त्यांना निवडून देण्याचा निर्धार केला आहे. डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे आज सकाळी १० वाजता यशवंत मैदान, नगरपरिषद मेहकर येथे जाहीर सभा घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच आंबेडकरांची तब्येत बिघडली होती. अॅन्जोप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही त्यांनी विधानसभा निवडणूक पाहाता, ते प्रचारात उतरले असून, डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्यासाठी ते मेहकरात येत आहेत. या जाहीर सभेच्यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आंबेडकरांचे विचार मानणारे समाजघटक यांच्यासह डॉ. ऋतुजा चव्हाण, शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व नेते हे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या जाहीर सभेत आंबेडकर या बोलणार, याकडे मेहकर, लोणार तालुकावासीयांचेच नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या सभेला मोठ्या संख्येने हजर रहावे, असे आवाहन डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.