डोंगरखंडाळा सरपंचपदी प्रज्ञा कांबळेच..! उपसरपंच श्याम सावळे यांच्या नेतृत्वातील संघर्षाला यश...

 
डोंगरखंडाळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या डोंगरखंडाळा ग्रामपंचायत सरपंचपदी प्रज्ञा कांबळे यांची ४ सप्टेंबर रोजी बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच श्याम सावळे यांच्या नेतृत्वात आधीच्या सरपंचविरोधात आणलेला अविश्वास ठराव असो की इतर संघर्षाला अखेर यश मिळाल्याचे बोलले जात आहे. 
डोंगरखंडाळा येथील १५ सदस्यीय ग्रामपंचायत असून सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. प्रारंभी सरपंचपदी बबन तुलाराम गाडगे यांची निवड झाली होती. मात्र त्यांची निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत  सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता. दरम्यान २० ऑगस्ट रोजी १३ विरुध्द १ मताने अविश्वास ठराव पारित झाला.
त्यामुळे नूतन सरपंच निवडण्यासाठी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. १५ पैकी १३ सदस्यांनी उपस्थित राहून मतदान केले. 
सकाळी १० ते १२ अर्ज दाखल करण्याची वेळ होती. सरपंच पदासाठी प्रज्ञा कांबळे यांनी आपला अर्ज दाखल केला. सूचक म्हणून साधना सावळे होत्या. प्रज्ञा कांबळे यांच्या विरोधात एकही अर्ज आला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी विजय टेकाळे यांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड केली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी डी. आर. सदावर्ते, उपसरपंच श्याम सावळे, सदस्य वसंता चव्हाण, सुनील चव्हाण, अनिता चव्हाण, नीलिमा सावळे, दिलीप काकडे, महेश सावळे, स्वाती सावळे, मीना सावळे, साधना सावळे, शोभा  इंगळे, प्रज्ञा कांबळे, गणेश पवार आदी उपस्थित होते.