परफेक्ट टायमिंग अन् तगडे नियोजन! नव्या दमाच्या मनोज कायंदेंना जनाधार वाढतोय; कोरी पाटी असल्याने मिळाला उदंड प्रतिसाद! समर्थकांना विजयाचा आत्मविश्वास....
Nov 18, 2024, 21:49 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकारणात कधी काय होईल कसे होईल याचा नेम नाही..आता तुम्ही सिंदखेडराजा मतदारसंघाचेच उदाहरण घ्या..अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत इथली लढत अस्पष्ट होती.. त्यानंतर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र निर्माण झाले..आता प्रचार थंडावला असताना मतदारसंघाचा कानोसा घेतला असता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज कायंदे यांचा जनाधार प्रचंड वाढल्याचे चित्र आहे. उमेदवारी मिळवण्याचे परफेक्ट टायमिंग आणि गेल्या १० दिवसांतील तगडे नियोजन यामुळे मनोज कायंदे या लढतीत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत.प्रस्थापितांसाठी कोरी पाटी असणारा हा चेहरा धोक्याची घंटा ठरत आहे..
अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनोज कायंदे यांची उमेदवारी घोषित झाली. महिनाभरापूर्वी वडिलांचे निधन झालेले, निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने फारसी तयारी नाही अशा परिस्थितीत मोठे आव्हान घेऊन मनोज कायंदे रिंगणात उतरले.मात्र पाहता पाहता या निवडणुकीत अशी रंगत आली की आता मतदार संघात यत्र तत्र सर्वत्र मनोज मनोज हेच नाव घुमत आहे.कोरी पाटी, स्वच्छ चारित्र्य आणि स्व.देवानंद भाऊ व नंदाताई यांनी करून ठेवलेली साखर पेरणी मनोज कायंदे यांच्यासाठी गोड फळे देणारी ठरत आहे. प्रचार काळात सिंदखेडराजा येथे झालेली छगन भुजबळ यांची सभा अभूतपूर्व आणि अतिविराट अशी ठरली. या सभेत छगन भुजबळ यांच्यासोबत मनोज कायंदे आणि नंदाताई कायंदे यांची भाषणे सुपरहिट ठरली. मनोज कायंदे यांचे भाषण सुरू असताना विकासाचे व्हिजन असणारा नेता बोलतोय हेच स्पष्टपणे जाणवत होते.त्या भाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अजूनही तुफान व्हायरल होत आहेत, ही निवडणूक कांयंदे यांच्या बाजूने भावनिक वळण घेत असल्याचे दिसत आहे. एकंदरीत मनोज कायंदे यांचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढला असून समर्थकांना विजयाचा प्रचंड आत्मविश्वास वाटतोय...