रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवा; संदीप शेळके यांचे आवाहन!शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा; ३० नोव्हेंबरला रक्तदान शिबिर!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन उबाठाचे जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी केले आहे. 

सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुरेसा रक्तसाठा नसल्यामुळे आवश्यक शस्त्रक्रिया सुद्धा लांबणीवर पडल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचार घेतात. खासगी रक्तपेढीतून रक्त घेणे त्यांना झेपत नाही. या रुग्णांसाठी शासकीय रक्तपेढी मोठा आधार आहे. त्यामुळे समाजातील रक्तदात्यांनी शासकीय रक्तपेढीत रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे. 
जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जेंव्हा रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले तेंव्हा राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. आपला रक्ताचा एक थेंब रुग्णाचा जीव वाचवू शकतो. त्यामुळे या शिबिरात रक्तदात्यांनी भरभरुन सहभाग नोंदवावा,असे आवाहन संदीप शेळके यांनी केले आहे.