पाणंद रस्त्यांमुळे वाचले शेतकऱ्यांचे जीव! आमदार श्वेताताईंकडून शेतकरी भावांना "भाऊबीज भेट "! "ते" शेतकरी भाऊ म्हणतात,२० नोव्हेंबरला देणार बहिणीला ओवाळणी...

 
  
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):रस्ते म्हणजे खऱ्या अर्थाने विकासाच्या धमन्या. ज्या तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात रस्ते विस्तीर्ण आणि गुळगुळीत असेल तेथे रोजगाराच्या संधी वाढतात. परिणामी आर्थिक सुबत्ताही येते. मात्र हे झालं शहरी भागाकरिता. ग्रामीण भागात आपला शेतमाल आडवळणाच्या रस्त्याने , काट्या कुपाट्यातून घरापर्यंत आणणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी अग्निदिव्यच. त्यात विषारी प्राण्यांनी दश केला किंवा काही घातपात घडला तर मग घरापर्यंत आणि तिथून दवाखान्यापर्यंत पोहोचण्याचा विचाराही न केलेला बरा. चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासाची चौफेर काम साधत शेतकऱ्यांसाठी हक्काचे पाणंद रस्त्यांचं जाळ विणणाऱ्या आमदार श्वेताताई महाले यांच्यामुळे जीवावर बेतलेला प्रसंग देखील निभावून गेला आहे ;त्याचं कारण ठरले ते दर्जेदार पाणंद 
रस्ते. सध्या दिवाळी चा सण साजरा होत असताना अनेक शेतकरी कुटुंबांसाठी आमदार श्वेताताई महाले यांच्याकडून "हीच आमच्यासाठी भाऊबीज भेट" आहे, आता २० नोव्हेंबरला आम्ही ताईला ओवाळणी देणार आहे अशा काळजाला भिडणाऱ्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

थकत नसतील का रस्ते..

 बसत नसतील का रस्ते...

सततचे पाहून मृत्यू..

 रडत नसतील का रस्ते?..

 आज रस्त्याने अपघाताच प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक लोक निष्काळजीपणाने वाहन चालून कुटुंबाला उघड्यावर पाडतात. मात्र दुसरीकडे शेतात जाण्यासाठी धड रस्ता नसल्याने उत्पादन झालेला शेतीमाल हा घरापर्यंत आणण्याची धडपड मायबाप शेतकऱ्यांना करावी लागते. धड बैल गाडी घेऊनही शेतात जाण्यासाठी व्यवस्थितपणे जाता येत नाही अशी स्थिती होते. त्यात जर का विषारी साप किंवा अन्य काही जीवावर बेतनारी घटना शेतकऱ्यांच्या बाबतीत घडली तर त्याला शेतातून घरी येण्यापर्यंतचा देखील वेळ मिळत नाही. अशा शेकडो घटना आजपर्यंत घडल्या आहेत. त्यामुळेच शेतात सहज आणि सुलभपणे जाता येईल यासाठी आवश्यक असलेल्या पाणंद रस्त्यांची कामे आणि त्यांना गती देण्याचं काम आमदार श्वेताताई महाले यांनी केले. कृषीक्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि त्यात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे रस्ते महत उपयोगी पडत आहेत. "मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेतून" अतिशय भक्कमपणे शेत रस्त्यांची कामे झाली.आमदार महालेताई यांनी केलेल्या या दर्जेदार रस्त्यांमुळेच दोन शेतकऱ्यांचा जीव वाचला आहे. आनंदाने त्या कुटुंबामध्ये आज दिवाळी सण साजरा होत आहे. 
   शेलोडी येथील एक शेतकरी शेतात फवारणी काम करत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. दुपारी ही घटना घडली. शेत हे गावापासून ३ किमी अंतरावर.. त्यामुळे सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याला गावापर्यंत आणण्यासाठी पाणंद रस्ता सहाय्यक ठरला. शेलोडी - करवंड या रस्त्याचे काम आमदार श्वेताताई महाले यांच्या पाठोपाठ प्रयत्नातून पूर्ण झालेले असल्याने गावातून ४०७ वाहन थेट शेतबांधापर्यंत आणता आली आणि त्यात दंश झालेल्या शेतकऱ्याला शहरात दवाखान्यात लगेच तीस मिनिटात उपचार मिळाले. विषारी सापाने दंश केलेला असताना अवघ्या ३० मिनिटात गावापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या शेतातून थेट शहरातील रुग्णालयात शेतकऱ्याला पोहचता आले ते केवळ शेत रस्त्यामुळे. अशीच एक घटना उत्रादा येथील ४२ वर्षीय शेतकरी उद्धव दामोदर इंगळे यांच्या बाबतीतही घडली. शेतात राबवत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांचेही क्षेत्रात त्याचे काम आमदार शेजारी महाले यांच्या पुढाकारातून पूर्ण झालेले होते. त्यामुळे ज्या शेतापर्यंत पायी जातानाच मोठे कष्ट घ्यावे लागायचे तिथपर्यंत थेट वाहनच गेल्याने तात्काळ त्यांना रुग्णालयात आणता आले. आयुष्याचा दीप हृदयविकाराच्या घाताने विझत असताना मजबूत शेत रस्ता असल्यामुळे उद्धव इंगळे यांना जीवदान मिळाले. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी श्वेताताईंची ही भाऊबीज भेट असल्याची प्रतिक्रिया उत्रादा येथील इंगळे कुटुंबीयांच्या सदस्यांनी दिल्या आहेत. "आमच्या ताईंनी केलेल्या कामामुळे आमचा जीव वाचू शकला, आता ताईंना आम्ही २० नोव्हेंबरला ओवाळणी देऊ" अशी बोलकी प्रतिक्रिया उद्घव इंगळे यांनी दिली
  आज क्षेत्ररस्त्यांच्या कामांमुळे शेतात उत्पादित झालेला शेतमाल थेट घरापर्यंत किंवा गोडाऊन पर्यंत नेताना सुलभ रित्या तो आणता येतो. आपत्कालीन परिस्थितीत शेतात काम करणाऱ्या शेतकरी शेतमजुरांचा जीव देखील त्यामुळे वाचवता येतो. आमदार श्वेताताई महाले यांच्या दृष्टीतून असलेल्या कामांमुळेच हे शक्य होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी बांधवांमधून येत आहेत.
तब्बल ६१२ शेत रस्ते मंजूर...
आमदार श्वेताताईंच्या पुढाकारातून चिखली विधानसभा मतदारसंघात तब्बल ७१४ किमीच्या ६१२ शेत रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यातील ६४ किमीच्या ४९ शेत रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.१४० किमीच्या ११५ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत..