पेरण्या तोंडावर... तरीही पीक कर्ज वाटपात दिरंगाई! जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचा इशारा — पीक कर्ज वाटप त्वरीत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा
May 23, 2025, 14:09 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्हवृत्तसेवा)– खरीप पेरणी तोंडावर आलेली असतानाही जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जासाठी अजूनही वणवण फिरत आहेत. पीक कर्ज वाटप केवळ १० टक्क्यांच्या आत असल्याने ही गती वाढवावी, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे.

यासंदर्भात बुधवत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी महिला आघाडी, उपजिल्हा प्रमुख, शहर व तालुका प्रमुख, युवक आघाडी आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५०० कोटींचे उद्दिष्ट, प्रत्यक्ष वाटप १५० कोटींच्याही आत!
जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात साडेसात लाख हेक्टरवर पीक लागवडीचे उद्दिष्ट आहे. मात्र १५०० कोटींच्या पीक कर्ज उद्दिष्टाच्या तुलनेत फक्त १५० कोटींचेच वाटप झाले आहे. बँकांकडून कागदपत्रांची अतिरिक्त मागणी, विलंब आणि शेतकऱ्यांची होणारी फरफट या मुद्द्यांकडे बुधवत यांनी लक्ष वेधले.

शिफारशी आणि मागण्या:
- बँक अधिकाऱ्यांची जिल्हा स्तरावर संयुक्त बैठक घ्यावी
- पीक कर्ज वाटपाचे सर्कलनिहाय तपशील उपलब्ध करून गती वाढवावी
- खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा
- बोगस बियाणे रोखण्यासाठी भरारी पथक आणि समित्या सक्रीय कराव्यात
- अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी बागायतदारांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी
वरील मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल, असा स्पष्ट इशारा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला.