खामगाव विधानसभेत सगळं काही OK..! जेवढी मते ईव्हीएम मते तेवढीच.....; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सगळ सांगितल....
Dec 13, 2024, 08:46 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव विधानसभा मतदारसंघातील पाच ईव्हीएम मशीनमधील मतदान व व्हीव्हीपॅटमधील स्लिपची झालेल्या मतमोजणीत फरक नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश हा जनादेश नसून केवळ ईव्हीएम मशीनची कमाल असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येऊ लागला आहे. वास्तविक पाहता ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांमध्ये राज्यात कोणत्याही प्रकारची तफावत अथवा फरक आढळून आलेला नसल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
खामगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ३२२ मतदान केंद्र होते. या ३२२ मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकालही जाहीर झाला. त्याचवेळी मतदारसंघातील ५ मतदान केंद्राच्या क्रमांकांची सरमिसळ करून निवडणूक निर्णय अधिकारी व मतमोजणी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदान केंद्र ईश्वरचिठ्ठीने निवडण्यात आले. अशा पाच मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील मोजलेले मतदान व व्हीव्हीपॅटमधील स्लिपची मोजणी करण्यात आली. या मोजणीमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांमध्ये कुठलीही तफावत आढळून आली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी सांगितले.....