अधिकारी सैराट मंत्री बेफिकीर! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल; पदभार घेताच ॲक्टिव मोडवर! मुख्यमंत्र्यांना केले चॅलेंज!

 राज्यातल्या पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक; ३ मार्चला काँग्रेस करणार राज्यव्यापी आंदोलन...

 
 मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदभार स्वीकारल्यापासून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल सुरू ठेवला आहे. याशिवाय काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींवर देखील त्यांनी लक्ष घातले आहे. आज,२५ फेब्रुवारीला त्यांनी मुंबईत राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत संघटनात्मक बांधणी बळकट करण्यावर चर्चा झाली, याशिवाय विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा करण्यात आली. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे आंदोलन प्रत्येक जिल्हा केंद्रावर होणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांना सांगितले. याशिवाय महापालिका क्षेत्रातील विकास कामे व जनतेशी कामे ठप्प पडली आहेत त्या विरोधात ४ मार्चला आंदोलन होणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. दरम्यान याच वेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. केंद्र आणि राज्य सरकार भांडवलदारांचे सरकार आहे. शेतकरी मरणाच्या उंबरठ्यावर आहे, मात्र सरकारला काहीही देणे घेणे नाही. मंत्र्यांचे पीए , पीएस नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी १०६ जणांना क्लीन चीट देत मान्यता दिली, तर १६ जण फिक्सर होते म्हणून त्यांना नियुक्ती दिली नाही असे म्हटले आहे.आता मुख्यमंत्र्यांनी त्या १६ फिक्सर अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत व त्या फिक्सर मंत्र्यांची ही नावे जाहीर करावीत ज्यांच्याकडे हे अधिकारी काम करत होते. फक्त अधिकाऱ्यांचा बळी घेऊन चालणार नाही फिक्सर मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी ती नावे जाहीर करावी असे चॅलेंज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिले..

मुख्यमंत्र्यांना राज्यातील सर्व सत्ता आपल्या हाती हवी आहे आणि केंद्रात पंतप्रधानांना सर्व सत्ता हाती हवी आहे, त्यामुळे सत्तेच्या विकेंद्रीकरणालाच भाजपा सरकारने हरताळ फासला आहे. मुदती संपूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नसल्याने लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, नगरसेवकांमार्फत जनतेची जी कामे होत होती ती आता होत नाहीत. प्रशासन,पालकमंत्री, आमदार यांची ठेकेदारी सुरू आहे असेही सपकाळ म्हणाले. जनतेची कामे होत नाही प्रशासन ठप्प आहे. महसूल विभागाचे अधिकारी बेकायदेशी रिसॉर्ट मध्ये पार्टी करतात, सर्व बेताल कारभार सुरू आहे. मंत्री बेफिकीर आणि अधिकारी सैराट आहेत असा घणाघात सपकाळ यांनी केला...