जिल्ह्याचा गौरव वाढवणारी बातमी! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हाताला यश;

आयुष मंत्रालयाच्या अभियानाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ५ रेकॉर्डची नोंद! चिखलीच्या आशुतोष गुप्तांनी सांभाळली अभियानाची कमान...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय आयुष्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आपल्या कर्तुत्वाने मंत्रिमंडळामध्ये छाप सोडली आहे. आयुष मंत्रालयाच्या वतीने देशभर राबविण्यात आलेल्या" देश का प्रकृती परीक्षण" या अभियानाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून या अभियाना अंतर्गत पाच गिनीज रेकॉर्ड आयुष मंत्रालयाच्या नावाने नोंद झाले आहेत. या अभियाना संदर्भातील आणि रेकॉर्ड संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी "देश का प्रकृती परीक्षण" या अभियानाची जबाबदारी सांभाळणारे चिखलीचे सुपुत्र डॉ. आशुतोष गुप्ता देखील उपस्थित होते...
  केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०२४ या महिनाभरात संपूर्ण देशामध्ये "देश का प्रकृती अभियान" हे अभियान राबविण्यात आले.
देशातील एक कोटी २९ लाखाहून अधिक नागरिकांच्या प्रकृतीचे यशस्वीरित्या परीक्षण करण्यात आले. या परीक्षणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाल्याची माहिती केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. याशिवाय या अभियानात नवीन पाच विश्व रेकॉर्ड प्रस्थापित झाले आहेत असेही त्यांनी सांगितले . या अभियाना देशभरात १ लाख ८१ हजार ६६७ स्वयंसेवकांनी योगदान दिले त्यांचेही आभार ना.प्रतापराव जाधव यांनी मानले. या अभियानादरम्यान देशभरातील माहिती संकलित करण्यात आली, या माहितीचा संशोधना करता उपयोग होणार असल्याचे ना.जाधव म्हणाले.
डॉ.आशुतोष गुप्तांनी सांभाळली कमान....
"देश का प्रकृती परीक्षण" या अभियानादरम्यान देशभरातील स्वयंसेवकांशी समन्वय साधने. डॉक्टरांशी संपर्क करणे, यासह अभियाना संदर्भात आवश्यक ती सर्व जबाबदारी चिखलीचे भूमिपुत्र डॉ.आशुतोष गुप्ता यांनी सांभाळली. पत्रकार परिषदेत ना.प्रतापराव जाधव यांनी डॉ.आशुतोष गुप्ता यांच्या कामाचे कौतुक केले...