बातमी पक्की! माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेस सोडलीच ! अजितदादांच्या राष्ट्रवादीत "या" तारखेला होणार जाहीर पक्षप्रवेश, भव्य सभेचे आयोजन!
५ हजार छत्र्या,२० हजार घड्याळी वाटणार! "बुलडाणा लाइव्ह" ने वर्तवलेला अंदाज १००१ टक्के ठरला खरा....
Jun 4, 2025, 18:00 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..आताची बातमी पक्कीच आहे.खामगावातील काँग्रेसचा बडा नेता राष्ट्रवादीच्या अजित दादांच्या गळाला लागला आहे.लवकरच हा नेता अजितदादांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या हातात बांधणार आहे.आपण गोष्ट करत आहे,काँग्रेसचे १५ वर्षे खामगाव'चे आमदार राहिलेले दिग्गज माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांचीच..सानंदा काँग्रेस सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची बातमी सर्वात आधी बुलढाणा लाइव्ह ने प्रकाशित केली होती. त्यावर अखेर आता शिक्कामोर्तब झाले आहे....
राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही ...सकाळी एका पक्षात असणारा नेता संध्याकाळी कोणत्या पक्षात जाईल? हे आपण गेल्या बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रात पाहतच आहे...नुकतेच महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपाने महाराष्ट्र काँग्रेसला नवा चेहरा मिळाला. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्याच जिल्ह्यातून हादरे बसत आहे. काँग्रेसचे दिग्गज माजी आमदार सानंदा यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या होम ग्राउंड मधूनच काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे...येत्या १३ जूनला राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षात त्यांचा भव्य पक्षप्रवेश होणार आहे हे जवळपास निश्चित झालेच आहे.
सानंदा यांची राजकीय कारकीर्द..
माजी आमदार दिलीप कुमार सानंदा खामगाव मतदार संघात सलग तीन वेळा आमदार होते.२०१४ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी स्वतःहून माघार घेतली होती.विधानसभा निवडणुकीपूर्वी सानंदा हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असतांनाच २०२४ मध्ये पुन्हा एकदा सानंदा यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी ८४ हजार पेक्षा अधिक मतदान घेऊन देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासूनच त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. विधानसभेचे तिकीट मिळवताना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता...
दिलीपकुमार सानंदा हे खामगाव मतदार संघात सलग पंधरा वर्षे आमदार म्हणून राहिले आहेत. मागील सहा महिन्यांपासून सानंदा काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा मतदारसंघात होत होत्या. अखेर मुहूर्त ठरला असून सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेश निश्चित झाला आहे. १३ जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत खामगाव येथे सानंदा यांचा जाहीर पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. मध्यंतरीच्या काळात उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,भाजपाचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील बड्या नेत्यांच्या भेटीसाठी घेतल्यामुळे त्यांच्या पक्षाप्रवेशांच्या चर्चांना अधिक बळ मिळाले होते.मात्र सानंदा कोणत्या पक्षात जाणार याबाबत संभ्रम होता.'जब तक जिंदा हु, तब तक काँग्रेस का परिंदा हू' म्हणत आपण काँग्रेस सोडून कुठे जाणार नसल्याचे सांगत सानंदा यांनी या चर्चांवर वारंवार पूर्णविराम दिला होता. मात्र राज्यात महाविकास आघाडीची झालेली वाताहत आणि पुढील ५ वर्षे सत्तेशिवाय कसे राहायचे या विचारात सानंदा यांनी काँग्रेस सोडण्याची चाचणी सुरू केली होती. सानंदा यांनी एकनाथ शिंदे यांचीही दोन वेळा भेट घेतली. भाजप श्रेष्ठींच्याही भेटी सानंदा घेत होते. मात्र सानंदा यांना पक्षात घेण्यास ना.आकाश फुंडकर यांनी विरोध केला, एकनाथ शिंदे च्या शिवसेनेतही सानंदा यांना प्रवेश होऊ नये यासाठी देखील फुंडकर यांनी फिल्डिंग लावली होती..अखेर सानंदा यांना अजित पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केल्यास सानंदा यांची अल्पसंख्यांक वोट बँक कायम राहील,शिवाय सत्तेमुळे सुरक्षा देखील मिळेल..याच हेतूने सानंदा यांनी काँग्रेस सोडत अजित पवारांचे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.. सानंदा यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे राजीनामा देखील पाठवला आहे..
दादांच्या राष्ट्रवादीला खामगाव सह जिल्ह्यात फायदा होणार?
खरंतर माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे विधानसभेपूर्वी अजित दादांना सोडून शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये परत गेले होते. दादांच्या राष्ट्रवादीला दमदार नेतृत्वाची जिल्ह्यात आवश्यकता होती.प्रचंड गाजावाजा, माहोल तयार करून वातावरण निर्मिती करून आपली छाप पाडण्याची कला माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यामध्ये नक्कीच आहे. राष्ट्रवादीला त्याचा किती फायदा होतो, हे आता येणारा काळच सांगेल..
जाहीर सभेसह भव्य शक्ती प्रदर्शन!
येत्या १३ जून रोजी सानंदा यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे. यावेळी जाहीर सभा व भव्यशक्ती प्रदर्शन खामगावात केले जाणार आहे.त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान बुक करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घड्याळ असलेल्या ५ हजार छत्र्या, २० हजार घड्याळ, १० हजार झेंडे, टी-शर्ट ची देखील ऑर्डर देण्यात आल्याची माहिती आहे....