माय देवकीचा पान्हा... माय यशोदेचा कान्हा लेक असो किती मोठा... मायसाठी परी तान्हा ..! आई भेटताच मंत्री ॲड.फुंडकरांना "आकाश"ही ठेंगणे !

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):सीनियर आमदार असतानाही मोदी - शहा आणि फडणवीसांच्या धक्का तंत्राचा परिचय यंदाच्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ यादीतून दिसून आला. ॲड. आकाश फुंडकर यांना थेट कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली. हा सोहळा फुंडकर कुटुंबीयांसह जिल्हा वाशियांसाठी अविस्मरणीय ठरला. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचा राजकीय वारसा चालवत असताना ॲड. आकाश फुंडकर यांनी घेतलेली झेप मोठी आहे. काल -परवा नागपूर येथे सुरू झालेल्या अधिवेशन कालावधीत त्यांच्या आई आणि बंधू सागर फुंडकर हे मंत्री महोदयांच्या दालनात भेटीसाठी गेले; त्यावेळी ना. फुंडकरांना "आकाश"ही ठेंगणे झाले होते. 
"माय देवकीचा पान्हा... माय यशोदेचा कान्हा 
लेक असो किती मोठा... मायसाठी परी तान्हा ..
माय सुखाची घागर, सुख तिच्या पदराले
हे पाहून वाटते माय असावी साऱ्याले .."
कवी जयंत चावरे यांच्या या ओळी आईच्या महतीचे गुणगान गातात. या जगामध्ये आईच्या त्यागाची आणि प्रेमाची सर कुणीही करू शकत नाही. काल परवा आकाश फुंडकर यांच्या नागपूर येथील मंत्री म्हणून मिळालेल्या कक्षामध्ये आई आणि भाऊ आल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा वेगळा आनंद स्पष्टपणे दिसून आला. स्वतःच्या सोशल माध्यमावर त्यांनी हा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. मंत्री म्हणून मिळालेली खुर्ची आणि त्यावर बसण्याचा मान त्यांनी आई सौ. सुनीताताई फुंडकर यांना दिला. ते स्वतः मध्ये बसले आणि बाजूला त्यांचे मोठे बंधू सागर फुंडकर बसलेले दिसून येत आहेत. यावेळी आईचे आशीर्वाद घेतले आणि वेगळी ऊर्जा जाणवल्याचेही नामदार आकाश फुंडकर यांनी आपल्या सोशल माध्यमावर भावना व्यक्त केल्या आहेत.