चिखलीच्या सभेतून मुकुल वासनिकांनी संजय गायकवाडांना केले "टार्गेट"! म्हणाले, गायकवाडांना त्यांची जागा दाखवून द्या! महाराष्ट्रात आता परिवर्तनाची लाट उसळल्याचेही विधान...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली येथे महाविकास आघाडीच्या वतीने राहुल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्यांची मांदियाळी दिसून आली.खा. राहुल गांधी या सभेला येणार होते मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने, ते येऊ शकले नाहीत. दरम्यान प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांचे प्रमुख भाषण या सभेत झाले. त्याआधी खा.मुकुल वासनिक यांचे भाषण चांगलेच गाजले. चिखलीच्या या भाषणातून मुकुल वासनिक यांनी बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांना टार्गेट केल्याचे दिसले. राहुल गांधी भारत जोडण्याचे काम करतात तर दुसऱ्या बाजूला बुलडाण्याचे आमदार राहुल गांधींची जीभ छाटण्याचे वक्तव्य करतात..असे म्हणत गायकवाड यांना धडा शिकवण्याचे आवाहन केले.
  पुढे बोलतांना मुकुल वासनिक म्हणाले की महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची लाट उसळली आहे. शिंदे-फडणवीस -अजित पवारांनी ज्या पद्धतीने नीच राजकारण केले त्यामुळे त्यांना सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली असल्याचेही मुकुल वासनिक म्हणाले. बुलडाण्याच्या आमदारांनी राहुल गांधींची जीभ छाटण्याचे वक्तव्य केले. त्यावेळी शिंदे फडणवीस पवार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करतील असे वाटले होते. मात्र गचाळ आणि वाचाळ भाषेचा वापर करणाऱ्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांनी गायकवाडांना पुन्हा उमेदवारी दिली. संजय गायकवाड हे शिंदे, फडणवीस, पवार, अमित शहांचे प्रतिनिधी आहेत..त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे म्हणत राहुल बोंद्रे, जयश्रीताई शेळके यांना विजयी करण्याचे आवाहन केले. राज्याच्या सत्ता परिवर्तनात बुलडाणा जिल्ह्याचा सिंहाचा वाटप असला पाहिजे असेही वासनिक म्हणाले.