जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आमदार श्वेताताई महाले यांची महिलांसाठी विशेष योजनांची मागणी; म्हणाल्या,

 आम्ही महिला फुलासारख्या कोमल,नाजूक,संवेदनशील पण प्रसंगी वज्राहूनही कठीण ;

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांनाही दिला इशारा..!

 
 मुंबई(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुंबईमध्ये सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी सभागृहाच्या पटलावर केलेले खास भाषण प्रचंड गाजले. हे भाषण चांगलेच व्हायरल होत आहे. त्यामध्ये आमदार श्वेताताई महाले यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या त्री शताब्दी वर्षानिमित्त महिलांसाठी काही विशेष मागण्या सभागृहात केल्या आहेत..
आपल्या भाषणामध्ये बोलतांना सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या की, आपल्या या महाराष्ट्रामध्ये कर्तव्याची चुणूक दाखवून आपल्या कर्तुत्वाने अजरामर झालेल्या हजारो महिला असून माँ जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, स्वराज्य रक्षक ताराराणी, महाराणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई या सगळ्या महाराष्ट्रासाठी नेहमीच ऊर्जेचा व प्रेरनेचा अखंड स्रोत राहिल्या आहेत.त्यांची प्रेरणा घेऊन सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैद्यकीय, संशोधन, अध्यात्मिक व इतर अनेक क्षेत्रात महिलांनी डोळे दिपवून टाकणारी कामगिरी केली आहे.विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करून महिलांनी समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.स्त्री पुरुष समतेचा विचार येथील मातीमध्ये येथील लोकशाहीमध्ये घट्ट रुजलेला आहे.त्यामुळेच राज्यातील व देशातील अनेक प्रमुख पदांवर महिला विराजमान झालेल्या आहेत असे श्वेता 
ताई म्हणाल्या..आज घडीला देशाच्या प्रथम नागरिक सर्वात प्रमुख पदावर राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू विराजमान आहेत.देशाच्या अर्थमंत्री पदावर श्रीमती निर्मला सीतारामन यासारखी कर्तृत्ववान महिला कार्यरत आहे.एवढेच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय पदावर मुख्य सचिव म्हणून श्रीमती सुजाता सौनिक या कार्यरत आहेत असा उल्लेख आ. श्वेताताईंनी केला. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर श्रीमती रश्मी शुक्ला यांच्यासारखी महिला कार्यरत आहे.यासारखी असंख्य महिलांच्या कर्तुत्वाची उदाहरणे आजूबाजूला पाहायला मिळतील.गावातील सरपंच पदापासून तर देशाच्या महामहिम राष्ट्रपती पदापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये महिला सर्व क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर दोन पाऊले पुढे जावून काम करतांना दिसत आहेत.त्याचप्रमाणे देशाच्या उन्नती मध्ये मोठ्या प्रमाणावर हातभार लावताना दिसत आहेत. छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या जिल्ह्यातून येत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही आ. श्वेताताई म्हणाल्या.या जिल्ह्याने लोकप्रतिनिधी म्हणून मला सेवेची संधी दिल्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ असून सबंध जनतेची जात, पात ,धर्म निरपेक्ष सेवा करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते.समाजाची सेवा करताना जाती धर्माचे राजकारण कधीच न करणाऱ्या आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला जेव्हा विशिष्ट समाजाच्या लोकांकंडून जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर अशा वेळेला समाजमन सुन्न होऊन जाते.अशा वेळेस आम्ही माँ जिजाऊ साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लेकी आहोत, आम्हाला फुलाप्रमाणे नाजूक, संवेदनशील, कोमल होऊन मने जपता येतात तर प्रसंगी वज्राहून कणखर ही होता येते असे ठामपणे सांगत आ. श्वेताताईंनी
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
  यावेळी सर्व लाडक्या बहिणींना सदैव खंबीर राहण्याचा व अन्याय सहन न करण्याचा व अन्यायाविरुद्ध सदैव आवाज उठवण्याचा सल्लाही आ. श्वेता ताईंनी दिला. महाराणी लक्ष्मीबाई, स्वराज्य रक्षक तारा राणी यांच्या शौर्याने प्रेरित आम्ही स्वराज्याच्या लेकी आहोत, समाजासाठी नेहमी झटत राहू व पुढे चालत राहू असेही आपल्या भाषणादरम्यान सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.
 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त सभागृहात चर्चा होत असताना अहिल्यादेवी होळकर यांना अपेक्षित असलेली समाज निर्मिती करण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरु राहील अशी अपेक्षा असल्याचे सौ. श्वेताताई म्हणाल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी गौरव उद्गार काढताना सौ. महाले म्हणाल्या की, अहिल्यादेवींनी चौंडी सारख्या अतिशय लहानशा खेड्यात जन्म घेऊनही आपल्या कर्तुत्वाने,आपल्या कर्मयोगाने आपले नाव अजरामर केले.त्यांच्या कणखर पणाला, करारीपणाला खरोखर तोड नव्हती.व्यक्तिगत जीवनात खचून टाकणाऱ्या असंख्य प्रसंगांना तोड देऊनही पुण्यश्लोक अहिल्यादेवीनि आपल्या व्यक्तिगत दुःखाचा परिणाम आपल्या राज्यकारभारावर होऊ दिला नाही.खंबीरपणे उभे राहून आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी लोककल्याणासाठी खर्चित केले.लोककल्यानासाठी प्रसंगी फुला सारख्या कोमल होणाऱ्या अहिल्यादेवी, राज्यकारभार करताना वज्रा पेक्षा कठोर झाल्याचे ही इतिहास पुरावे देत आहे.राज्यकारभार करताना आर्य चाणक्यनिती वापरून सदैव लोककल्याण करणाऱ्या अहिल्यादेवींचे चारित्र्य सदैव आपल्याला प्रेरणा देणारे ठरेलं असेही सौ. महाले म्हणाल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची प्रगतीच्या दिशेने घोडदौड होत असताना त्यात महिला सबळीकरणाच्या दिशेने राज्यामध्ये सुरु असलेल्या विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला.त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली लखपती दीदी योजनेचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राने घेतल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
महिला सक्षम झाल्या तर राष्ट्र मजबूत होते त्यामुळे महिलांसाठी राज्यात आणखी काय करता येईल यासंबंधी काही सूचना ही सौ. श्वेताताई महाले यांनी सभागृहात दिल्या.महिलांसाठी विशेष उद्योग व व्यवसाय धोरणाची तसेच ग्रामीण महिलांच्या आरोग्यासाठी विशेष उपकेंद्रे ग्रामीण भागात स्थापन करायला हवीत यावर त्यांनी विशेष जोर दिला.महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पोलीस पथके व सायबर सुरक्षिततेसाठी विशेष प्रावधान असून त्यात अधिक सुधारणा करणे गरजेचे असल्याचे सौ. श्वेताताई महाले यांनी सभागृहात बोलतांना सांगितले.स्वतःचा व्यवसाय थाटून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची हिंमत दाखवणाऱ्या महिलांसाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व आर्थिक सुविधा आपल्याला निर्माण करता येतील असा विश्वास सौ. महाले यांनी व्यक्त केला.
परतूरच्या तहसीलदार असलेल्या श्रीमती प्रतिभा गोरे यांच्यावर वाळू माफियामार्फत झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित शिक्षा देण्याची मागणी केली व त्यासोबतच प्रशासनात काम करणाऱ्या महिलांसाठी योग्य सुरक्षा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणीही केली.
समग्र शिक्षा अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुंबईत सुरु केलेल्या उपोषणामध्ये काही माता-भगिनींची तब्येत खालावत असल्याने संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांनी त्यांना त्वरित भेट देऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी विनंतीही सौ. श्वेताताई महाले यांनी सभागृहाला केली.त्याचप्रमाणे राज्यपाल महोदयाच्या अभीभाषणाला उत्तर देताना मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी लागू असलेली 50% फी सवलत 100% केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री यांचे समस्त लाडक्या बहिणीच्या वतीने स्वागत केले.