


"मातोश्री "ने लाडक्या बहिणीलाच उतरवले मैदानात ! ३९ वर्षानंतर पहिल्यांदाच मिळाली महिलेला उमेदवारी ; जयश्रीताई शेळके महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधणार....
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच गाजणार आहे. इथे विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड आहेत. गायकवाड आणि वाद हे समीकरण गेल्या ५ वर्षांपासून कायम आहे. मागील २ महिन्यात आ.गायकवाड राहुल गांधींची जीव छाटण्याच्या वक्तव्याने चर्चेत आले होते. त्यावेळी काँग्रेसने एकजुटीने केलेला गायकवाड यांचा निषेध जिल्हाभरात गाजला होता. विशेषतः जयश्रीताई शेळके यांनी ज्या आक्रमक पद्धतीने गायकवाडांचा निषेध केला त्याची जिल्हाभर चर्चा झाली आणि "रणरागिनी" म्हणून त्या समोर आल्या.
खरेतर लोकसभा निवडणुकी वेळीच जयश्रीताई शेळके यांनी उमेदवारी मागितली होती मात्र त्यावेळी त्यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. मात्र तरीही त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जिल्हा पिंजून काढला होता. स्वतः उद्धव ठाकरे यांनी खामगावच्या सभेत जयश्रीताई शेळके यांना समोर बोलावून कौतुक केले होते. आता विधानसभा निवडणुकीसाठी जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी मिळाल्यामुळे बुलडाणा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. गेल्या २० वर्षांपासून जयश्रीताई शेळके सामाजिक चळवळीत कार्यरत आहेत. जिजाऊ ब्रिगेडमध्ये केलेल्या कामामुळे जयश्रीताई शेळके यांचा महाराष्ट्रभर दांडगा संपर्क आहेत. शिवाय बुलडाणा जिल्ह्यात दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून महिलांना उद्योजिका बनवण्यासाठी त्यांनी उभारलेली लोकचळवळ त्यांना घराघरात घेऊन गेली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला बुलडाण्यात त्यांनी घेतलेला बचत गट प्रदर्शनी मेळावा सुपर - डुपर -हिट ठरला होता. एकंदरीत जयश्रीताई शेळके आणि शेळके परिवाराचा दांडगा जनसंपर्क, नातेवाईकांचा गोतावळा त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ जयश्रीताईंच्या पाठीशी राहणार असल्याने आ. गायकवाडांसाठी ही निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत....