

माँ जिजाऊंचे स्मरण व स्वर्गीय वडिलांना अभिवादन करून मनोज कायंदे यांनी घेतली आमदारकीची शपथ!
Dec 8, 2024, 14:36 IST
बुलडाणा (लाइव्ह ग्रुप नेटवर्क)"राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, संत चोखामेळा, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना व माझे वडील देवानंदजी कायंदे यांच्या स्मृतींना अभिवादन करून मी मनोज नंदाताई देवानंद कायंदे शपथ घेतो की.." अशाप्रकारे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज नंदाताई देवानंद कायंदे यांनी विधानसभेच्या सभागृहात आज रविवार ८ डिसेंबर रोजी आमदार पदाची शपथ घेतली.
मातृतीर्थ सिंदखेडराजा म्हटले की एकच नाव व चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे, राजमाता जिजाऊ माँ साहेब. याच जिजाऊ माँ साहेबांच्या नावाने शपथेची सुरुवात मनोज नंदाताई देवानंद कायंदे यांनी केली. याच मतदारसंघाचे आध्यात्मिक वैभव म्हणजे वारकरी संप्रदायाचे विठ्ठलभक्त संत चोखामेळा यांनाही त्यांनी वंदन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार हा शाहू-फुले-आंबेडकरांचा, या विचारांना त्यांनी अभिवादन केले. शपथ ही मर्यादित वेळेतच घ्यावयाची असल्याने व ती हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर देत असल्याने, त्याला काही सांसदीय मर्यादा असतात. पण या वेळेच्या बंधनातही मनोज कायंदे यांना तीव्रतेने आठवण झाली ती स्वर्गीय वडील देवानंद कायंदे यांची. यावेळी विधिमंडळाच्या प्रेक्षक गॅलरीत मनोज कायदे यांचे मोठे बंधू सतीश कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी व मित्रमंडळी उपस्थित होती.
जे स्वप्न वडिलांनी बघितलं होतं, आईच्या माध्यमातूनही ते पूर्णत्वास येऊ शकलं नव्हतं.. ते स्वप्न प्रत्यक्षात साकार केलं त्यांचेच सुपुत्र असणाऱ्या मनोज कायदे यांनी. ते सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले, आणि आज शपथबद्ध होताना त्यांनी अभिवादन केले ते स्वर्गीय वडील देवानंदजी कायंदे यांना !