मलकापुरातून मनिष लखानींच्या नावावर जनमनाची मोहर! लखानींचे नाव समोर येताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह...

 
मलकापूर(स्वप्निल आकोटकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपने २० ऑक्टोबरला पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची घोषणा केली. मलकापूरची जागा भाजप लढवणार हे १०० टक्के निश्चित असले तरी संचेती आणि तायडे यांच्या अंतर्गत कलहामुळे या दोघांऐवजी तिसऱ्या पर्यायाचा विचार भाजप नेतृत्वाकडून होत आहे. यासाठी मनिष लखानी यांचे नाव आघाडीवर आहे. विचारधारेचे खरे खुरे पाईक असलेल्या मनिष लखानींचे नाव समोर येताच मतदारसंघातील जनमानसातून आता आम्हाला लखानीच उमेदवार पाहिजे अशी मोहर उमटत आहे..

 

मलकापूर मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता भाजपने हा गड कायम आपल्याच ताब्यात ठेवला होता. आता पुन्हा एकदा चैनसुख संचेती इच्छुक असले तरी "चेहऱ्यात बदल हवा" ही प्रामाणिक इच्छा शेकडो भाजप कार्यकर्त्यांची आहे. शिवचंद्र तायडे इच्छुक असले तरी ते काँग्रेस मधून भाजपवासी झाले आहेत. भाजप विचारधारेचा आणि तायडे यांचा तसा अर्थाअर्थी संबंध नाही. शिवाय तायडे यांचे गतकाळात व्हायरल झालेले काही व्हिडिओ देखील त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे संचेती नको ,तायडे नको आम्हाला नवा चेहरा द्या असा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे..हाच आग्रह भाजपच्या पारंपारिक मतदारांचा सुद्धा आहे. या पार्श्वभूमीवर मनिष लखानी यांच्या नावावर भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडून शिक्का-मोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. 

नेता नव्हे कार्यकर्ता...
   
  मनिष लखानी यांचा मतदारसंघातील गावागावात थेट संपर्क आहे. विशेष म्हणजे हिंदुत्वासाठी प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलला काम करणारा "कार्यकर्ता" ही मनिष लखानी यांची ओळख आहे. शिवाय विचारधारेची पक्की बैठक ही सुद्धा लखानी यांच्यासाठी जमेची बाजु आहे. नेता नव्हे तर कार्यकर्ता या भूमिकेत मनिष लखानी वावरत असल्याने ते सर्वांना जवळचे वाटतात. जात - पात - पंथ - पक्ष याच्यावर येऊन लखानींसाठी अनेक जण एकत्र येऊ शकतात. त्यामुळे आता मनिष लखानी हेच भाजपचे उमेदवार हवेत असा सूर उमटत आहे.शिवाय कोरी पाटी असलेल्या मनिष लखांनींवर आरोप करायलाही राजेश एकडे यांच्याकडे काहीच असणार नाही..त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे मलकापूर मतदारसंघातील तमाम जनतेचे लक्ष लागून आहे...