चिखलीत पंडितराव देशमुख यांच्या प्रचारार्थ उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा! थंडीत वातावरण तापणार....गर्दी उसळणार
Nov 24, 2025, 13:18 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या चिखलीचे राजकीय वातावरण कमालीच्या थंडीतही सध्या तापले आहे. चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचाराने जोर पकडला आहे.. स्वतः आमदार श्वेताताई महाले पाटील नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज आहेत. सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत त्या मतदारांच्या संपर्कात आहेत. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्यासाठी भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक घर पिंजून काढत आहेत, आता या प्रचाराचा कळस म्हणजे उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिखलीत जाहीर सभा घेणार आहेत.
गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या वेळी आ. श्वेता ताई महाले पाटील यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली सभा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशी ठरली होती. २०१७ मध्ये देखील नगरपालिकेच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस चिखलीत आले होते,आणि नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला होता. आता उद्या होणारी सभा देखील अभूतपूर्व करण्याचा चंग भाजप कार्यकर्त्यांनी बांधला आहे. चिखली शहरातील ऐतिहासिक अशा राजा टॉवर परिसरात दुपारी १ वाजता ही सभा होणार आहे. या सभेला भाजप,कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे..
