बुलडाण्यात महाविकास आघाडीची वज्रमुठ! जालिंधर बुधवतांच्या नेतृत्वातील मशाल यात्रेत हर्षवर्धन सपकाळांनीही घेतला सहभाग; म्हणाले, "त्यांच्या"विरोधात एकजुटीने लढू....

 
Budhvat
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलडाणा विधानसभा मतदारसंघात निघालेल्या मशाल यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. गावोगावच्या कॉर्नर मीटिंग आणि भेटीगाठी दरम्यान राज्यातील सरकारविरोधातील आक्रोश सामान्यांकडून व्यक्त होत आहे. मोताळा तालुक्यातील शंभरावर गावांचा प्रवास करून ही यात्रा आता कालपासून घाटावरील बुलडाणा तालुक्यातील गावागावांत जात आहे. दरम्यान आज,१४ सप्टेंबरला माजी आमदार तथा काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनीही काही काळ या मशाल यात्रेत सहभाग घेत जालिंधर बुधवंत यांना सदिच्छा दिल्या. महाभ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने लढू , ताकदीने लढू असे यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
 मशाल यात्रेला आज, सकाळी डोंगरखंडाळा येथून सुरूवात झाली.त्यानंतर वरवंड, भादोला, पोखरी आणि माळविहीर या गावांत ही यात्रा पोहचली. माळविहीर येथे हर्षवर्धन सपकाळ या मशाल यात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांना शुभेच्छा दिल्या. नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या मशाल जागर यात्रेबद्दल त्यांनी बुधवंत यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. दरम्यान आता यात्रा पुढील गावांसाठी मार्गस्थ झाली आहे. आज सावळा, सुंदरखेड, अजीसपूर, नांद्राकोळी, सागवन, कोलवड, अंभोडा, हतेडी खुर्द, हतेडी बु, तांदुळवाडी, उमाळा आणि देऊळघाट या गावांत यात्रा जाणार आहे.