स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकदिलाने उतरणार – डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे ठोस प्रतिपादन..!बुलडाण्यात महाविकास आघाडीची समन्वय बैठक उत्साहात पार...
Jun 22, 2025, 18:22 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांची खरी कसोटी असून या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकसंघपणे आणि ताकदीनिशी लढणार आहे," असे प्रतिपादन माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.
बुलडाण्यातील नर्मदा हॉलिडेज येथे २२ जून रोजी महाविकास आघाडीच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिंगणे होते. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार राजेश एकडे, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेश शेळके, प्रसेनजीत पाटील, नानाभाऊ कोकरे, प्रकाश पाटील, साहेबराव सरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. शिंगणे म्हणाले, "राज्यात सत्ताधाऱ्यांनी केवळ प्रलोभनाच्या आधारे सत्ता मिळवली. ‘लाडकी बहिण योजना’सह अन्य घोषणा केवळ निवडणुकीपुरत्या होत्या. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले; पण अंमलबजावणी झाली नाही. खरीप हंगाम सुरू होत असताना पीककर्ज आणि विमा यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत."
त्यांनी पुढे सांगितले की, "स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने त्यागाची भावना ठेवून एकसंघपणे काम करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुकीची तयारी सरकारने दर्शवली आहे, अशा वेळी जनता महाविकास आघाडीच्या अपेक्षेने पाहत आहे."
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी या निवडणुकांमध्ये समन्वयाच्या माध्यमातून ताकदीनिशी उतरणार असल्याचे सांगितले. आमदार सिद्धार्थ खरात यांनी ग्रामीण भागातील जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष असून, या निवडणुकांत त्याचे प्रतिबिंब दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला.
माजी आमदार राजेश एकडे यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावणे गरजेचे असल्याचे मत मांडले. शिवसेनेच्या जयश्रीताई शेळके यांनी जनतेच्या स्थानिक प्रश्नांवर सरकारला जाब विचारत रान उठवण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे श्याम उमाळकर यांनी नेत्यांच्या समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
या बैठकीत पांडुरंग पाटील, दत्ता पाटील, लक्ष्मणराव घुमरे, छगन मेहेत्रे, संगीतराव भोंगळ, ज्योती खेडेकर, बी.टी. जाधव, अशोक पडघान, दत्तात्रय लहाने, रियाज खान पठाण, संदीप शेळके, नंदू कऱ्हाडे, आशिष राहटे, गजानन वाघ, संतोष रायपुरे, शुभम पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन लखन गाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन धांडे यांनी मानले.