EXCLUSIVE बुलडाण्याच्या जागेवर महाविकास आघाडीकडून पुनर्विचार? चर्चा सुरू असतानाच उबाठाने एबी फॉर्म दिल्याने काँग्रेसकडून नाराजीचा सूर! प्रसंगी मैत्रीपूर्ण लढत.!

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी उबाठा शिवसेनेने काँग्रेसच्या जयश्री शेळकेंना शिवबंधन बांधून एबी फॉर्मही दिला. त्यामुळे जयश्रीताई शेळके विरुद्ध संजय गायकवाड अशी लढत रंगण्याचे चित्र स्पष्ट होत असताना काँग्रेसच्या गोटातून मात्र खळबळजनक बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ४ ते ५ जागांवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्या जागांवर उबाठा शिवसेनेशी चर्चा सुरू असतानाच उबाठाने एकतर्फी निर्णय घेतल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे "त्या" जागांमध्ये बुलडाण्याची जागा सुद्धा असून जयश्री शेळके यांना एबी फॉर्म दिल्याने काँग्रेसकडून नाराजीचा सूर आवळण्यात येत आहे."पंजा नसेल तर करायचे काय? त्यासाठी प्रसंगी आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत अशी प्रतिक्रिया एका काँग्रेस नेत्याने दिली आहे..
  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने अद्याप बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या जागेचा हट्ट सोडला नाही. प्रदेश काँग्रेसने बुलडाणा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे मागितला आहे, मात्र शिवसेना देखील त्या जागेवर अडून आहे.शिवसेनेचा निरोप प्रदेश काँग्रेसने अखिल भारतीय स्तरावर पोहचवला आहे, त्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मध्ये आज सायंकाळी चर्चा होणार आहे . मात्र त्याआधीच शिवसेनेने बुलडाण्याच्या जागेवर परस्पर उमेदवाराला एबी फॉर्म दिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. 

सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती?.
  लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवर चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली होती.त्यानंतर तिथे काँग्रेसच्या विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीत काँग्रेस विशाल पाटलांच्या मागे उभी असल्याचे दिसले आणि विशाल पाटलांचा विजय झाल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते. त्यामुळे लोकसभेत झालेल्या चुका होऊ नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उबाठा शिवसेनेवर दबाव वाढवला आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या काही जागांवर पुनर्विचार व्हावा अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मागणी आहे..त्यामुळे काही जागांवरील उमेदवारांना उबाठा शिवसेनेने निरोप पाठवला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घाई करू नका अशा सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले...