बुलडाण्याच्या सर्वव्यापी, सर्वस्पर्शी विकासासाठी मशाल पेटवा! जयश्रीताईंचे आवाहन! म्हणाल्या, दडपशाही झुगारून मतदान करा; सागवन, कोलवडमध्ये प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद....
Nov 6, 2024, 09:33 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघात विकासाच्या नावाखाली केवळ गाजर दाखवण्याचे काम झाले आहे. ज्या कामात जास्त कमिशन तीच कामे झाली आहेत.त्यामुळे मतदार संघात तळागाळापर्यंत विकास पोहोचलाच नाही असा आरोप करीत माय-बाप जनतेने संधी दिल्यास सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वव्यापी सर्वस्पर्शी विकास करेल असे प्रतिपादन बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी केले.काल,५ नोव्हेंबरला सागवन - कोलवड गावांत जयश्रीताई शेळकेंचा प्रचार दौरा संपन्न झाला..या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.या वेळी गावकऱ्यांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या..
मोजक्या लोकांना सुविधांचा लाभ झाला म्हणजे विकास होत नाही तर विकासाची खरी व्याख्या ही सर्व समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणणे ही आहे. सर्वसामान्य अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असताना जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचे काम बुलडाणा विधानसभा मतदारसंघात झाल्याचे त्या म्हणाल्या. राज्यात आणि केंद्रात आंधळे सरकार आहे. महागाईने जनता वैतागली आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, महिला सुरक्षित नाहीत, तरुणांच्या हाताला काम नाही, महाराष्ट्रातील रोजगार गुजरात मध्ये पळवण्याचे काम सुरू आहे या सगळ्या बाबींना महाविकास आघाडी सरकार हेच एकमेव उत्तर आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरला मशाल पेटवा आणि सेवेची संधी द्या.. दडपशाहीला झुगारून मतदान करा असेही जयश्रीताई शेळके म्हणाल्या. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.