भय भ्रष्टाचाराच्या अंधकारातून प्रकाशाकडे जाऊ! राहुल बोंद्रेनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; म्हणाले,२३ नोव्हेंबरला विजयी फटाके फोडू......

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाविकास आघाडीची मधली अडीच वर्षे सोडली तर गेल्या १० वर्षांपासून गल्ली ते दिल्ली एक खाणारे सरकार सत्तेत आहे. हे खाणारे सरकार काय खाईल याचा नेम नाही.. महागाईने सर्वसामान्यांच्या ताटातील घास देखील या सरकारने हिरावून घेतला आहे. जिकडे तिकडे भय आणि भ्रष्टाचाराचे साम्राज्य आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भय भ्रष्टाचाराच्या या अंधकारातून आपण प्रकाशाकडे जाण्याचा संकल्प करू, सत्याकडे जाण्याचा संकल्प करू अशा शब्दात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा चिखली विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांनी जिल्हावासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खरी दिवाळी २३ नोव्हेंबरला होईल, त्या दिवशी आपण विजयाचे फटाके फोडू असेही राहुल बोंद्रे यांनी म्हटले आहे..

२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला.२०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एक आदर्श सरकार कसे असते हे त्यावेळी महाराष्ट्रातील तमाम जनतेने पाहिले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून काम पाहिले.मात्र पैशांच्या भरवशावर जनतेचे हे सरकार उलटवून लावण्याचा डाव फडणवीस आणि शहा यांनी रचला. गेली अडीच वर्षे या सरकारने सर्व सामान्य जनतेला केवळ लुटण्याचे काम केले आहे. आता या सरकारला धडा शिकवण्याची संधी २० नोव्हेंबरला आपल्याला प्राप्त झालेली आहे. या संधीचे सोने आपल्याला करावे लागेल असेही राहुल बोंद्रे यांनी आपल्या म्हटले आहे.