श्रीक्षेत्र माकोडी येथे खोपडी बारस सोहळ्याचे आयोजन..

 समर्थ सदगुरु श्रीहरी महाराजांची उपस्थिती राहणार; तिन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल...
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): श्रीक्षेत्र माकोडी येथे चातुर्मास समाप्ती निमित्त खोपडी बारस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ११, १२ व १३ नोव्हेंबर या तिन दिवसांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल यानिमित्ताने चैतन्य मंदिर परिसरात राहिल. समर्थ सदगुरु श्रीहरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमांना राहणार आहे. राम नामाच्या प्रचार अन् प्रसारासाठी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सदगुरु श्रीहरी महाराज यांच्या दर्शनाचा लाभही भाविकांना होणार आहे.

 खोपडी बारस हा माकोडी भक्तांसाठी वार्षीक धार्मिक महोत्सव असतो. त्यामुळे तिन दिवस सदगुरु भक्तांची मांदीयाळी पहावयास मिळते. 

 दि. ११ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता काकड आरतीने महोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर पुजाविधी स्थापना व सकाळी ८ वाजता श्रीहरी महाराजांच्या हस्ते होमकुंड प्रज्वलीत करण्यात येईल. सकाळी ११ वाजेपर्यंत रामनामाच्या गजरात हवन पार पडेल. दुपारी १२ वाजता आरती नंतर प्रसाद, दुपारी ३ ते ५ होमहवन, सायंकाळी ६ वाजता दैनंदिन उपासना व नंतर प्रसाद वाटप होईल. एकदशीला १२ नोव्हेंबरला पहाटे काकडा आरती, ७ ते ११ होमहवन, दुपारी आरती फराळ प्रसाद, त्यानंतर ३ ते ५ होमहवन यजमान जोडप्यांच्या हस्ते पार पडेल.
दरम्यान मलकापूर, निरपूर, जळगाव, जामोद, धामणगाव बढे, लिहा यासह पंचक्रोशीतील अनेक पायीदिंड्यांचे श्रीक्षेत्री आगमन होईल. सायंकाळी उपासनेनंतर भाविकांसाठी फराळप्रसाद वाटप होईल. रात्री ८ वाजता हभप डॉ कल्याणीताई पद्मने (अकोला ) यांचे किर्तन पार पडेल. दि. १३ नोव्हेंबर रोजी काकड आरती नंतर सकाळी ८.३० वाजता रामनाम जपाची श्रीहरी महाराजांच्या हस्ते यज्ञकुंडात पुर्णाहूती देण्यात येईल. सकाळी ९ वाजता समर्थ सदगुरु श्रीहरी महाराजांचे मुख्य मार्गदर्शन होईल. दरम्यान उपस्थित भाविकांना श्रीहरी महाराजांच्याहस्ते कापड प्रसादाचे वितरण होणार आहे. हभप ज्ञानेश्वरमाऊली निरपुरकर यांचे किर्तन, नंतर दुपारी नैवद्य आरती झाल्यावर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी तुळशी
विवाहाने सोहळ्याची सांगता होईल. दरम्यान अखंड पहारा सुरू झाला असून पंचक्रोशीतील भाविक ही सेवा देत आहेत.या सोहळ्यासाठी भाविकांचे आगमन श्रीक्षेत्र माकोडी येथे सुरु झाले आहे.