खा.मुकुल वासनिक उद्या चिखलीत! महाविकास आघाडीचे राहुल बोंद्रे उद्या भरणार उमेदवारी अर्ज; खा.कल्याणराव काळे, कुणाल चौधरी, संदेश आंबेडकरही राहणार उपस्थित; राजा टॉवरजवळ होणार सभा...
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघासाठी यावेळीही काँग्रेसने माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित झाल्यानंतर राहुल बोंद्रे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेऊन बेरजेच्या राजकारणावर भर दिला..आता अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात उद्या,२९ ऑक्टोबरला प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत राहुल बोंद्रे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे जिल्हा काँग्रेसवर ज्यांचा एकहाती वचक आहे असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा.मुकुल वासनिक उद्या राहुल बोंद्रे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार आहेत. यावेळी जालन्याचे खा.कल्याणराव काळे,प्रदेश काँग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी, संदेश आंबेडकर यांचीही उपस्थिती राहणार आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेने उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित राहुल आशिर्वादाचे पाठबळ द्यावे असे आवाहन राहुल बोंद्रे यांनी केले आहे..