देऊळघाटमध्ये जयश्रीताईंची जोरदार हवा! जनसंवाद रॅलीला तुडूंब गर्दी; हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, जयश्रीताईंना भरभरून मतदान करा! जयश्रीताई म्हणाल्या,सर्वांना सोबत घेऊन विकास करणार...
Nov 15, 2024, 09:33 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची यंदाची लढाई ऐतिहासिक आहे. ही लढाई सर्व सामान्यांच्या हक्काची आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला मिळण्यासाठी, महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात जे काही झाले ते नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आता परिवर्तन अत्यंत आवश्यक आहे, बुलडाणा मतदारसंघाची शांत ,सुसंस्कृत आणि सभ्य ओळख टिकून ठेवण्यासाठी जयश्रीताई शेळके यांच्या पाठीशी उभे रहा, त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेसने ते हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. देऊळघाट येथे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारार्थ जनसंवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रॅलीला संबोधित करताना हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, उमेदवार जयश्रीताई शेळके, प्रा. डी.एस. लहाने यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. हे खोके बहाद्दर लोकांचे सरकार उलथवून लावण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. हे सरकार असंवैधानिक पद्धतीने अस्तित्वात आले आहे. गुंडगिरी, दहशतीचे राजकारण आता जनता खपवून घेणार नाही असेही सपकाळ म्हणाले.
महाराष्ट्राच्या उभारणीत मुस्लिम समाजाचे मोठे योगदान – जयश्रीताई शेळके
सर्व जाती धर्म पंथ संप्रदायांना सोबत घेऊन पुढे जाण्याची महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये मुस्लिम समाज बांधवांचे योगदान विसरता येणार नाही. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या उभारणीतही मुस्लिम समाज बांधवांचे मोठे योगदान होते.. महाराष्ट्राच्या या श्रेष्ठ व सांस्कृतिक परंपरेला अनुसरूनच सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल आपल्याला करायची आहे असे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी केले.
सर्वांगीण विकासाची क्षमता जयश्रीताईंतच – प्रा.डी.एस. लहाने
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर जयश्रीताई शेळके याच एकमेव पर्याय आहेत. सर्व जाती धर्म पंथ संप्रदायांना सोबत घेऊन चालण्याचे काम जयश्रीताई करतात. त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचण्यासाठी जयश्रीताई शेळके यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन प्रा.डी.एस. लहाने यांनी केले.