Amazon Ad

जालिंधर बुधवंत धृपदरावांच्या भेटीला! बुधवंत म्हणाले, धृपतभाऊमुळे महाविकास आघाडीची ताकद वाढली...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सहकार आणि ग्रामीण राजकारणावर पकड असलेले मातब्बर नेते धुरपतराव सावळे यांनी नुकताच भाजपमधून स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीसाठी ही बाब "भक्कम" ठरणारी असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी काल,त्यांची सदिच्छा भेट घेतली.

धृपतराव सावळे म्हणजे सरपंच पदापासून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यातच बुलढाणा विधानसभा व चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांची विशेष पकड आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही बुलडाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये धृपदराव सावळे व जालिंदर बुधवत यांनी एकत्रितरित्या महायुतीसाठी काम केले होते. अर्थात त्याचा रिझल्ट देखील त्यावेळी दिसून आला होता. कालांतराने राजकीय घडामोडी बदलल्या. सकाळचा शपथविधी, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार ..एकनाथ शिंदे यांचे बंड आणि शिवसेनेचे दोन गटात झालेले रूपांतर सगळ्यांनी अनुभवले.धृपतराव सावळे यांना भाजपने जिल्हाध्यक्ष दिले होते. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळातच जिल्हा परिषदेमध्ये भाजपने सत्ता मिळवली होती...अर्थात त्यावेळी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचे मंत्री पदाचे सत्ताबळही सोबत होते. आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. काल परवाच मुंबई येथे रमेश चैनीथल्ला व नाना पाटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये स्वगृही धृपदराव सावळे परतले आहेत. ही बाब महायुतीसाठी धक्कादायक म्हणावी लागेल तर महाविकास आघाडीच्या दृष्टीने सावळे यांची ताकद आणि राजकीय अनुभव पाहता जमेची बाजू ठरणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत हे महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारीसाठी आग्रही आहेत. 

त्यातच त्यांनी गाठीभेटींवर जोर वाढवला आहे. मशाल जागर यात्रा आणि आक्रोश मोर्चाने चांगला माहोल तयार केला आहे. घाटावर आणि घाटाखाली मोताळा तालुक्यातही जालिंदर बुधवत यांच्या भेटीगाठींची सत्र सुरू आहे अशातच त्यांनी धृपतराव सावळे यांची घेतलेली भेट आणि अर्थातच त्यावेळी झालेली राजकीय चर्चा ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. दरम्यान "धृपतराव सावळे यांच्यामुळे महाविकास आघाडीची ताकद निश्चितच वाढली असून त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणारच आहे" अशी प्रतिक्रिया बुधवंत यांनी दिली आहे..