Amazon Ad

जालिंधर बुधवत म्हणाले, निष्ठेची ताकद अन् जनतेचा विश्वास विजयी परिवर्तन घडवून आणणारच! लोक दादागिरी आणि दहशतीला जुमानणार नाही!

 बुलडाण्यात उबाठा शिवसेनेचा विधानसभा बूथप्रमुखांचा मेळावा दणक्यात....
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसैनिकांना निवडणुका नव्या नाहीत. किंवा निवडणुका आल्या म्हणून ते तयारीला लागत नाहीत. सतत - अविरत जनसेवेमध्ये कार्यरत असलेले शिवसैनिक हीच मातोश्रीची खरी ताकद आहे. आज या ठिकाणी बूथप्रमुखांच्या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद हा महत्त्वाचा असून निष्ठेची ताकद आणि सामान्य माणसांचा विश्वास हा बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी परिवर्तन नक्कीच घडवणार असा विश्वास जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केला.बुलढाणा विधानसभा मतदार संघातील बूथप्रमुखांचा मेळावा बुलढाणा येथील जांभरून रस्त्यावर असलेल्या वाय. बी. लॉन्स येथे आज,१९ ऑक्टोबरला दुपारी पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, जिल्हा संघटक प्रा. डी.एस. लहाने, माजी तालुका प्रमुख वासुदेव बंडे पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, किसान सेनेचे अशोक गव्हाणे, अपंग सेलचे जिल्हा प्रमुख रामदास सपकाळ, उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, मोताळा शहर प्रमुख रमेश धूनके, किसान सेना उप जिल्हा गजानन उबरहंडे, युवासेना उप जिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, शुभम घोंगटे, युवासेना तालुका प्रमुख संजय शिंदे, सुधाकर आघाव, एकनाथ कोरडे, सचिन परांडे, सुनील गवते, विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, मोहम्मद सोफियान, मोहित राजपूत, पवन देशमुख, भागवत शिकारे, बबन खरे, गणेश सोनुने, संजय गवळी, प्रियंका क्षीरसागर या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत म्हणाले की, दोन आमदार आणि एक खासदार या ठिकाणी उद्धव साहेबांची साथ सोडून गेले. त्यांना वाटलं होतं पूर्ण पक्ष त्यांच्यासोबत जाईल. पण निष्ठा आजही महाराष्ट्रात जिवंत आहे. फुटकळ स्वार्थासाठी संकटात साथ सोडणारी माणसं ही इतिहास घडवू शकत नाहीत. त्यांची गद्दार म्हणूनच इतिहास नोंद घेत असतो. शेतकरी मायबाप आज अस्मानी आणि सुलतानी संकटामध्ये मेटाकुटीस आले आहेत. उद्धव साहेबांनी सत्तेवर आल्याबरोबर कर्जमाफी केली होती. पुन्हा एकदा आपल्याला महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे; जेणेकरून मायबाप शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. निवडणुकीत प्रत्येक मतदाराला मतदानापर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्याला करायचा आहे.त्यासाठी जनजागृती वर जोर द्यावा लागेल. बूथप्रमुखांची, शाखाप्रमुखांची भूमिका यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर आपल्या सगळ्यांचे काम आहे.

आचारसंहिता लागल्यामुळे सामान्य माणसाने देखील बोलायला सुरुवात केली आहे. लोक आता दादागिरी आणि दहशतीला जुमानणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतपेटीतूनच प्रत्येकाला बदल घडवून आणायचा आहे. त्यासाठी आपण सजगपणे काम करावे असे आवाहन याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले. 

                
हरी
Related img.
  याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांनी देखील मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन नंदू कऱ्हाडे यांनी तर आभार मोहम्मद सोफियान यांनी मानले. याप्रसंगी श्री विजयइंगळे यांना मोताळा तालुक्याच्या तालुका प्रमुख पदी जबाबदारी देण्यात आली. तसेच श्री पवन देशमुख यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बुलडाणा विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या मेळाव्याला बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महीला आघाडी, किसान सेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे उप जिल्हा प्रमुख , तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.