जालिंधर बुधवतांनी मुक्ताईनगर गाठले अन् एकनाथ खडसेंची भेट घेतली! चर्चा काय झाली?
Oct 2, 2024, 22:21 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या जिल्हाभरातील शिवसैनिकांत शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून आ.संजय गायकवाड यांच्याशी विधानसभा निवडणुकीत दोन हात करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून मतदारसंघात काढलेली मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चा सुपरहिट ठरला. दरम्यान जालिंधर बुधवंत यांनी भेटीगाठींवर देखील जोर दिला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची त्यांनी काल,२ ऑक्टोबरला भेट घेतली, यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.
एकनाथ खडसे यांचा बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील काही भागांत चांगला प्रभाव आहे. त्यामुळे खडसे यांचे सहकार्य बुधवंत यांना मिळाल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. कालच्या भेटीत जालिंधर बुधवंत यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शिवाय बुलडाणा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या तयारीची माहिती देत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
एकनाथ खडसे यांनी देखील आपण सोबत आहोत असा शब्द बुधवंत यांना दिला. चांगली तयारी करा, योग्य नियोजन करा असा वडिलकीचा सल्ला देखील खडसे यांनी बुधवंत यांना दिला.