रविकांत तुपकरांच ठरलं! महाविकास आघाडीसोबत जाणार नाही;काही मतदारसंघात कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना; बुलडाण्यात काय करायचं? २९ ऑक्टोबरपर्यंत ठरवणार...
Oct 26, 2024, 15:30 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाविकास आघाडी सोबत चर्चा फिस्कटल्यानंतर रविकांत तुपकर यांची भूमिका काय राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. अखेर आता तुपकर यांनी त्यांची भूमिका जाहीर केली असून, महाविकास आघाडीने सन्मानाने सोबत घेतले नाही, फरपटत त्यांच्यासोबत कशाला जायचे? असे म्हणत महाविकास आघाडी सोबत जाणार नाही अशी भूमिका तुपकर यांनी जाहीर केली आहे. शिवाय काही मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काय करायचे याबाबतचा निर्णय २९ ऑक्टोबरला घेणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. बुलडाणा येथे रविकांत तुपकर यांनी आज कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलवली होती.या बैठकीनंतर रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका जाहीर केली...
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी रविकांत तुपकर यांचे प्रयत्न सुरू होते. त्या संबंधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चाही सुरू होती. मात्र अखेर उमेदवारीची माळ जयश्रीताई शेळके यांच्या गळ्यात पडली. दरम्यान आज बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की "उद्धव ठाकरे यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा सुरू होती, त्यांनी आम्हाला हो सांगितले होते..
मात्र अचानक वेळेवर निर्णय बदलला. त्यांना जर आमची गरज नसेल, सन्मानाने सोबत घेत नसतील तर आम्ही फरफटत त्यांच्यासोबत जाणार नाही असे रविकांत तुपकर म्हणाले. काही मतदारसंघात कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्याचे आम्ही सूचना केली आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात स्वच्छ चारित्र्याच्या, शेतकरी चळवळीशी पार्श्वभूमी असलेल्या चांगल्या विचाराच्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचेही रविकांत तुपकर यावेळी म्हणाले. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाबाबत काही निर्णय घ्यायचा याबाबत आम्ही २९ ऑक्टोबर पर्यंत ठरवू असेही तुपकर यांनी जाहीर केले...