मातृतीर्थाचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी माझी! महाराष्ट्राला हेवा वाटेल असा मतदारसंघ बनवणार; डॉ.शशिकांत खेडेकरांचे प्रतिपादन !

 डॉ. शिंगणेंवर झाडल्या आरोपांच्या फैरी..म्हणाले, २५ वर्षांत मतदारसंघाचे वाटोळे केले...

 

 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा मतदारसंघाची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे ती छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंमुळे...विकासाचे व्हिजन असते तर सिंदखेड राजा मध्ये पर्यटकांचा ओढा वाढला असता, परिणामी अनेकांच्या हाताला काम लागले असते मात्र दूरदृष्टीच्या अभावी सिंदखेडराजाचा विकास रखडला आहे. एवढे गतवैभव इतिहासाने आपल्याला उपलब्ध करून दिलेले असताना देखील २५ वर्षांत त्यांनी एक काम धड केले नाही..त्यापेक्षा जास्त कामे मी माझ्या ५ वर्षांच्या कार्यकाळात केली. आता मायबाप जनतेने आशीर्वाद दिल्यास सिंदखेडराजा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी माझी.. सबंध महाराष्ट्राला हेवा वाटेल एवढी कामे या मतदारसंघात करू असे प्रतिपादन सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी केला. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील लोणार तालुक्यांतील वीरपांग्रा, महारचिकना यासह विविध गावात आज,७ नोव्हेंबरला त्यांचा प्रचार दौरा संपन्न झाला, यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

   यावेळी पुढे बोलतांना डॉ.शशिकांत खेडेकर म्हणाले की, या मतदारसंघाला २५ वर्षे बिनकामाचे आमदार मिळाले. मंत्री पद मिळूनही त्यांना लोकांसाठी काही करता आले नाही.. सिंदखेडराजा मतदारसंघाच्या तुलनेत जिल्ह्यातील इतर मतदारसंघांची तुलना करा तेव्हा विकास काय असतो ते समजेल..जर हे बाकी आमदारांना जमू शकते तर मग यांना एवढ्या वर्षात एक हाती सत्ता असताना का जमू शकले नाही? असा सवाल डॉ.खेडेकर यांनी केला. ह्यांनी काही कामे तर केलीच नाही उलट आपण मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय घेतले असा आरोपही डॉ.खेडेकर यांनी डॉ.शिंगणे यांच्यावर केला. आता मतदार संघातील जनतेने पक्के ठरवले आहे..२५ वर्षात जनतेच्या स्वप्नांची वाटोळे करणाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही डॉ.खेडेकर म्हणाले..ज्यांनी महायुतीत खेळ करण्याचा प्रयत्न केला त्यांचाच खेळ आता जनता करणार आहे असेही डॉ.शशिकांत खेडेकर म्हणाले..