चिखलीच्या प्रभाग १३ मध्ये अपक्ष उमेदवाराचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीला जाहीर केला पाठिंबा !
Nov 26, 2025, 18:10 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने महत्त्वाची राजकीय कलाटणी देणारी घटना प्रभाग १३ मध्ये घडली आहे. या प्रभागातील प्रतिष्ठित अपक्ष उमेदवार विजय सोनवाल यांनी महाविकास आघाडीला अधिकृतपणे जाहीर पाठिंबा देत निवडणूक समीकरणे बदलून टाकली आहेत. त्यांच्या पाठिब्यांमुळे नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे तसेच मविआचे प्रभाग १३ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार आनंद सुभाष गैची, सौ. रजनी निखील जागृत यांना बळ मिळाले आहे.
प्रभाग १३ मध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक कामांमुळे चांगली ओळख असलेल्या विजय सोनवाल यांच्या या निर्णयाने महाविकास आघाडीची ताकद अधिक भक्कम झाली आहे. स्थानिक मतदारांमध्ये त्यांची विश्वासू प्रतिमा,प्रभागातील घराघरातील वैयक्तिक संपर्क आणि युवकांमध्ये असलेली लोकप्रियता या सर्वांचा थेट फायदा आघाडीच्या उमेदवारांना होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजय सोनवाल यांच्या निर्णयाचे स्वागत केले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांच्याकडे पाठिब्यांचे पत्र सोनवाल यांनी दिले आहे. या पाठिंब्यामुळे प्रभाग १३ मध्ये आघाडीच्या बाजूने वातावरण स्पष्टपणे फिरताना दिसत आहे.कार्यकर्ते, युवक आणि मतदार यांच्यात उत्साहाचे नवीन वातावरण संचारले असूनविकासासाठी एकजूट हा नारा आता लोकांमध्ये खास चर्चेचा ठरत आहे.