मेहकर- लोणारच्या मातीत शिवसेनेला पराभूत करणारा जन्माला आला नाही अन् येणारही नाही! केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव स्पष्टच बोलले! आमदार रायमुलकरांचा विजय कुणीच रोखू शकत नाही म्हणाले...
Oct 26, 2024, 07:04 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर- लोणार मध्ये गावागावात घराघरात शिवसैनिक आहेत.शिवसैनिक म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचे जिवंत उदाहरण आहे. उबाठा वाल्यांनी हिंदुत्व सोडले आहे मात्र हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. मेहकर लोणारच्या या मातीत शिवसेनेला पराभूत करणारा अजून जन्माला आला नाही अन् येणारही नाही असे रोखठोक प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केले. मेहकर येथील शिवसेना कार्यालयात एका बैठकीला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मायाताई म्हस्के, तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकार,शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गाडेकर, कविताताई दांदडे, शहराध्यक्ष वैशाली सावजी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, तालुकाप्रमुख भूषण घोडे, शहराध्यक्ष जयचंद बाठिया ,अख्तर चुडीवाले, तोफिक कुरेशी, हनीफ गवळी उपस्थित होते.
या बैठकीला संबोधित करतांना ना.जाधव पुढे म्हणाले की,लोकसभा निवडणुकीत लोक भुलथापांना बळी पडली. विरोधी पक्षातील नेते जे कधीच इकडे दिसले नाहीत..लोकांच्या सुख दुःखात दिसले नाहीत तरीही त्यांच्या भुलथापांना बळी पडून लोकांनी त्यांना मतदान केले. गेल्या ३५ वर्षांपासून बाळासाहेबांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांवर आम्ही काम करत आलो.विकासाची प्रचंड कामे आमदारांनी मी केली..अर्ध्या रात्री फोन आला तरी आम्ही लोकांशी बोलतो, चर्चा करतो..समस्या सोडवतो..मेहकर लोणार तालुक्यातील लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी कधी तुपकर - खेडेकर इकडे फिरकले काय? असा सवाल करीत याचा विचार करण्याची गरज आहे असे ना.जाधव म्हणाले. निवडणुका आल्या की बाहेरचे पार्सल इथे येतात..लोकांची दिशाभूल करतात आणि निघून जातात..ते इथे राहतच नाही, ते लोकांच्या सुखदुःखात काय सहभागी होणार असा टोला ना.जाधव यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचे नाव न घेता लगावला..
आपले आमदार २५ तास ऑन ड्युटी...
मतदान करतांना कोण आपले काम करू शकतो..गत काळात कुणी आपले कामे केली..आपण अडचणीत होतो तेव्हा कोण धावून आले याचा विचार मतदारांनी केला पाहिजे. आपले आमदार डॉ.संजय रायमुलकर म्हणजे २४ तास ऑन ड्युटी असतात.त्यामुळे इथली जनता त्यांच्यासोबत आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा रेकॉर्ड ब्रेक मतांनी त्यांना विजयी करण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले...