चिखलीत आमदार महाले आणि राहुल बोंद्रे यांच्यात थेट लढत! बुलडाण्यात आमदार गायकवाड यांच्यासमोर मोठे आव्हान! आ.गायकवाड विरोधी सुप्त शक्ती एकवटणार?

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभेच्या निवडणुकांची काल,१५ ऑक्टोबरला घोषणा झाली..२० नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे.आता तयारीसाठी अवघा उणापुरा महिना हातात आहे..बुलडाणा जिल्ह्याच्या राजकीय गतिविधिंना आता वेग आला आहे..चिखली आणि बुलडाणा या दोन मतदारसंघात सरळ - सरळ लढत होईल असे एकंदरीत चित्र आहे..चिखलीत आमदार श्वेता महाले विरुद्ध माजी आमदार राहुल बोंद्रे अशी थेट लढत पहायला मिळणे जवळपास निश्चित आहे तर बुलडाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होतांना दिसत आहे. त्यात उमेदवार म्हणून आजघडीला शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांचे नाव आघाडीवर आहे...

 

 चिखली विधानसभेत मागील निवडणुकीत आमदार श्वेता महाले यांनी राहुल बोंद्रे यांचा पराभव करीत विजय मिळवला होता. दोघांच्या मध्ये त्यावेळी ६ हजार मतांचा फरक होता. वंचितच्या अशोकराव सुरडकरांमुळे राहुल बोंद्रेंच्या अडचणी वाढल्या होत्या.आता पुन्हा ५ वर्षांनंतरची परिस्थिती वेगळी आहे, त्यावेळी होता तसा वंचितचा माहौल आता नाही..त्यामुळे हा काळ आणि वेळेत झालेला बदल कुणाच्या पथ्यावर पडतो हे येणारा काळच सांगणार आहे. आमदार महालेंनी अलीकडच्या दोन वर्षांत मतदारसंघात विकासकामांचा झपाटा लावला, गावागावांत शेकडो कोटींची विकासकामे झाली ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. मतदारसंघावर त्यांनी मजबूत पकड निर्माण केली आहे.मात्र असे असले तरी राहुल बोंद्रे यांचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहेच. महाविकास आघाडीच्या एकजुटीचा त्यांना ताकदीने मुकाबला करावा लागणार आहे..

 माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी गत काळात आमदार महाले यांच्याविरोधात रान पेटवले. भ्रष्टाचाराचे आरोप केले.मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांचा आक्रमक अवतार दिसला..त्याचा काही प्रमाणात का होईना फायदा राहुल बोंद्रे यांना होणार आहे. चिखलीत सध्यातरी तिसरा पर्याय दिसत नाही त्यामुळे या थेट लढतीत कोण बाजी मारणार?  हे २३ नोव्हेंबरला कळणार आहे..

आमदार गायकवाडांना निवडणूक सोपी नाही?

दुसरीकडे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आमदार संजय गायकवाड विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होईल. महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळवण्यासाठी बरेच इच्छुक असले तरी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांचे नाव आघाडीवर आहे.जयश्री शेळके यांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावला असला तरी उमेदवारीच्या स्पर्धेत त्या थोड्या मागे पडल्या आहेत. हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड ही नावे काँग्रेसकडून इच्छुक आहेत मात्र जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता कमीच आहे. रविकांत तुपकर आता नेमकी काय भूमिका घेतात? यावर देखील बरेच काही अवलंबून असणार आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या पराभवासाठी महाविकास आघाडीची एकजूट झाली तर मात्र आमदार संजय गायकवाड यांना निवडणूक सोपी जाणार नाही असे दिसते. मात्र महाविकास आघाडीत नाराजी- नाट्य राहिल्यास त्याचा फायदा आ.गायकवाड यांना होईल..त्यामुळे संजय गायकवाड यांच्याविरोधातील काही "सुप्त- शक्ती' महाविकास आघाडीतील नेत्यांची एकत्रित मोट बांधण्यात गुंतल्या असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे...