जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रभाग रचने संदर्भात महत्त्वाचे अपडेट! राज्याचे प्रधान सचिव बुलढाण्यात आले अन्...

 
 बुलढाणा (जिमाका : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेची प्रक्रिया गतिमान झाली असून, या संदर्भातील आढावा प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात घेतला.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, 1961 अंतर्गत तसेच ग्रामविकास विभागाच्या १२ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार, जिल्ह्यात ६१ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि १२२ पंचायत समिती निर्वाचक गणांची नव्याने प्रभाग रचना करण्यात येणार आहे.
या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, प्रभारी तहसीलदार शशिकांत वाघ तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान प्रधान सचिव डवले यांनी प्रभाग रचना प्रक्रियेचा तपशीलवार आढावा घेतला. त्यांनी निर्देश दिले की, प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना १४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात यावी. यानंतर २१ जुलैपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात याव्यात. त्यानंतर २८ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी यांनी प्राप्त हरकतींसह प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावा. ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत या हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे आदेशही देण्यात आले.
तसेच, १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. संपूर्ण प्रक्रिया ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक, कायदेशीर व काटेकोरपणे पार पाडावी, असेही प्रधान सचिवांनी स्पष्टपणे सांगितले.