सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करा! जिल्हा काँग्रेसची मागणी; बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेसचा एल्गार मोर्चा...

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सत्तेवर येण्यापूर्वी सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनासह आश्वासनांची खैरात वाटली होती मात्र केंद्र आणि राज्य सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यामुळे सरकारने तात्काळ सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या सूचनेवरून जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज, ३ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बुलढाण्याच्या गांधीभावनातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल बोंद्रे बोलत होते.
advt
Advt. 👆

   शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव, थकलेला पिक विमा, सिंचन अनुदान व इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी भवनातून या मोर्चाला प्रारंभ झाला. बुलढाणा शहरातील बाजारपेठ, कारंजा चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी महायुती सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला जोडे मारत सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. सरकार सत्तेमध्ये गुंग आहे, शेतकरी मेला तरी त्यांना फरक पडत नाही. खोटे आश्वासने देऊन त्यांनी सत्ता मिळवली असा आरोप करीत महायुतीवाल्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज असायला हवी असे राहुल बोंद्रे म्हणाले. कृषिमंत्री कोकाटेंचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बाहेर आलेला आहे, त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा असेही राहुल बोंद्रे म्हणाले. मोर्चाच्या प्रारंभी गांधीभवनात सभा झाली, या सभेला काँग्रेस नेत्यांनी संबोधित केले.