अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा! ना. प्रतापराव जाधव यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना..
Sep 6, 2024, 14:33 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात या आठवड्यात अतिवृष्टी झाली. हजारो शेतकरी यामुळे बाधित झाले. शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावू नका, तातडीने पंचनामे करा आणि शासनाला सादर करा असे स्पष्ट निर्देश केंद्रीय मंत्री ना प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
२ आणि ३ सप्टेंबरला बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, तूर, मुंग, उडीद, मका ही पिके उध्वस्त झाली आहेत. अनेक गावे बाधित झाली आहेत, मेहकर तालुक्यातील ४८ हेक्टर जमीन पूर्णतः खरडून गेली आहे. बुलडाणा ,चिखली, खामगाव, नांदुरा ,शेगाव ,मोताळा, मेहकर, लोणार या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे. पंचनामे करतेवेळी पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी, कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकारी कमर्चाऱ्यांमध्ये समन्वय साधून एकही बाधित शेतकरी नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, पंचनामे झाल्यानंतर एक प्रत शेतकऱ्यांना द्यावी या संदर्भातील नियोजन आपल्यास्तरावरून करावे असे निर्देश केंद्रीय मंत्री ना. जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.