विचारधारेशी प्रामाणिक असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार! सिंदखेडराजा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी मांडला विचार;भाजपच्या भूमिकेमुळे डॉ. शशिकांत खेडेकरांचे बळ वाढणार?

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण सामना होत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेस मधून आलेले मनोज कायंदे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर मैदानात आहेत. दरम्यान आता महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या भाजपची भूमिका काय? असा प्रश्न मतदार संघात चर्चिला जात आहे. काल, देऊळगावराजा येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली..दरम्यान विचारधारेशी प्रामाणिक असणाऱ्या उमेदवारासोबत आपण रहावे अशी भूमिका बहुतांश भाजप कार्यकर्त्यांनी मांडली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांचे बळ वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे..
 
डॉ.राजेंद्र शिंगणे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या तळ्यात मळ्यातल्या भूमिकेमुळे महायुतीच्या इच्छुकांमध्ये गोंधळ उडाला होता. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी शिंदेंच्या शिवसेनेने डॉ.खेडेकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेस मधून राष्ट्रवादीत आलेल्या मनोज कायंदे यांनाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुणीही अर्ज मागे घेतला नसल्याने आता इथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. दरम्यान आता महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या भाजपची भूमिका काय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.काल देऊळगाव राजात भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे, विनोद वाघ यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली. काही कार्यकर्त्यांनी मनोज कायंदे यांची साथ द्यावी अशी बाजू मांडली मात्र बहुतांश कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवित विचारधारेशी प्रामाणिक असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभे रहावे. भाजपची मूळ विचारधारा ही हिंदुत्व आहे, या विचारधारेला पोषक असणाऱ्या उमेदवाराच्या बाजूने आपण उभे राहायला हवे अशी मते बहुतांश कार्यकर्त्यांनी मांडली. या बैठकीत अंतिम निर्णय झालेला नसला तरी आणखी उद्या एक बैठक बोलावण्यात आलेली आहे. काल झालेल्या बैठकीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पाठवण्यात आला आहे..दरम्यान भाजपच्या विचारधारेला पुरक भुमिका घेणाऱ्या उमेदवाराची साथ द्यावी अशी बहुतांश कार्यकर्त्यांची मागणी असल्याने शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर यांचे बळ वाढणार असल्याची चर्चा आहे..

भाजपचे कार्यकर्ते म्हणतात..

 
भाजप हा पक्ष "राष्ट्र सर्वप्रथम" या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. या विचारामुळेच पक्ष आजवर इथपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे विचाराला तिलांजली देणाऱ्या उमेदवाराचे काम करण्यापेक्षा भाजपच्या विचारधारेला पोषक असणाऱ्या उमेदवाराचे काम करावे असा विचार आम्ही बैठकीत मांडला आहे... सुनील परीहार, प्रदेश कार्यकारणी सदस्य ओबीसी सेल...