साडेचार वर्षे झोपा काढल्या,निवडणुका जवळ आल्यावर डॉ. शिंगणेंना मतदारसंघ आठवलाय! मा. जि. प सदस्य दिलीप वाघ यांची घणाघाती टिका! सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात मशाल यात्रा सुपरहिट.....
Sep 23, 2024, 08:11 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्याच्या सरकारचा अपवाद सोडला तर जेव्हा जेव्हा सत्ता आली तेव्हा तेव्हा "ते"मंत्री झाले. एवढी वर्षे हाती सत्ता असूनही जिल्ह्यातल्या सर्वाधिक मागास मतदारसंघ म्हणून सिंदखेडराजाची ओळख आहे,ही अतिशय लज्जास्पद बाब आहे. यांना निवडणुका जवळ आल्या तेव्हाच मतदारसंघाचा पुळका येतो.साडेचार वर्षे त्यांनी तिकडे झोपा काढल्या आता निवडणुका तोंडावर आल्या म्हणून मतदारसंघ आठवलाय अशी घणाघाती टिका माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उबाठा शिवसेनेचे नेते दिलीप वाघ यांनी केली. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात मशाल यात्रा निघाली आहे, काल २२ सप्टेंबरला उमरद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कॉर्नर बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हाप्रमुख बद्री बोडखे, तालुकाप्रमुख महेंद्र पाटील यांच्यासह शिवसैनिक ,ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५ सप्टेंबर पासून सिंदखेडराजा मतदारसंघात सुरू झालेली मशाल यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे. मतदारसंघातील गावोगावी ही यात्रा पोहचत आहे. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुण, महिला यांच्या समस्यांना सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी ही मशाल यात्रा निघालेली आहे. २५ सप्टेंबरला सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चाने या मशाल यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेला तुफान प्रतिसाद मिळत आहे.काल,२२ सप्टेंबरला सिंदखेडराजा शहर, उगला, पळसखेड चक्का, पिंपळगाव लेंडी, उमरद या गावांत या यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यावेळी गावोगावी झालेल्या कॉर्नर बैठकीत दिलीप वाघ यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
करून दाखवू...
अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतला. कोरोना काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. मात्र गेल्या अडीच वर्षातील महायुतीचे सरकार हे आतपर्यंतचे सर्वात खादाड आणि महाभ्रष्टाचारी असे सरकार आहे. सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदारदेखील या खादाड सरकारच्या टोळीचा भाग आहेत. मतदारसंघाची त्यांनी वाट लावली, विकासाला वाऱ्यावर सोडले आता जनता त्यांना नक्की त्यांची जागा दाखवेल असा प्रहारही दिलीप वाघ यांनी केला. गेल्या ३० वर्षात जेवढा विकास झाला नाही त्यापेक्षा दहापटीने विकास राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर व सिंदखेडराजा मतदारसंघावर उबाठा शिवसेनेचा भगवा फडकल्यावर करून दाखवू असेही ते म्हणाले.