मी राजमाता जिजाऊंची लेक! घाबरणार नाही; माझी उमेदवारी जिंकण्यासाठीच! प्रेमलता सोनोनेंचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन! बुलडाणा मतदारसंघ सोडून देण्याच्या धमक्या आल्याचाही गौप्यस्फोट....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मी राजमाता जिजाऊंची लेक आहे..मी घाबरणारी नाही..माझी उमेदवारी कुणाला पाडण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आहे असे प्रतिपादन बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवार प्रेमलता सोनोने यांनी केले. आज,५ नोव्हेंबरला स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

 

यावेळी प्रेमलता सोनोने यांनी निवडणूक लढवण्यामागची भूमिका विषद केली. बुलडाणा जिल्हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे, त्यामुळे एखादा मतदारसंघ महिलेला राखीव असावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मात्र लाडक्या बहिणीच्या या मागणीची त्यांनी दखल घेतली नाही ही बाब आमच्या जिव्हारी लागल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे लाडकी बहीण केवळ नावाला आहे का? असा सवालही त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने, छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मात्र दखल घेत आपल्याला उमेदवारी दिल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

 धमक्या आल्या..
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मला अनेक फोन आले. काही धमक्या आणि सूचना आल्या. बुलडाणा विधानसभा मतदारसंघ सोडण्याचे सांगितले, तुम्हाला मुल बाळ आहेत..असेही सांगण्यात आले..मात्र मी राजमाता जिजाऊ ची लेक आहे,घाबरणार नाही असेही त्या म्हणाल्या. मला धमक्या कुठून आल्या? कुणी दिल्या हे सांगण्याचे मात्र त्यांनी टाळले. मी आयुष्यात कधीही सेटलमेंट केली नाही.. सेटलमेंटसाठी आंदोलने केली नाहीत..मी निवडणुकीच्या रिंगणात रहावे ही जनतेची इच्छा आहे असेही प्रेमलता सोनोने म्हणाल्या...