म्हणे राज्यपालपद देतो; ५ कोटी रुपये उकळले ; भामट्याने ५६ वर्षीय व्यक्तीला फसवले....
Dec 9, 2024, 08:23 IST
नाशिक(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): "माझी अनेक राजकीय नेत्यांसोबत ओळख आहे.. माझ्यासोबत त्यांच्या नियमित बैठका होत असतात.. देशातल्या कुठल्याही एका राज्याच्या राज्यपाल पदी मी तुमची नियुक्ती करून देतो.."असे आमिष दाखवत एका तरुणाने ५६ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. फसवणूक झालेली ५६ वर्षी व्यक्ती चेन्नईची राहणारी असून तरुण नाशिकचा आहे..एखाद्या हिंदी सिनेमाचे कथानक भासावे असा हा प्रकार आहे..
प्राप्त माहितीनुसार सुरेश कुलकर्णी(४०, रा.श्री गंधर्वनगरी, नाशिकरोड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मुंबई नाका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई येथील रहिवासी नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी (५६) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी सुरेश कुलकर्णी याने रेड्डी यांना नाशिकच्या एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. माझी अनेक राजकीय नेत्यांसोबत ओळख आहे. "मी कोणत्याही एका राज्याचे राज्यपाल पद तुम्हाला मिळवून देऊ शकतो. या कामासाठी सर्विस चार्ज म्हणून मला १५ कोटी रुपये द्यावे लागतील.." असे कुळकर्णी याने रेड्डी यांना सांगितले.
पुन्हा भेटायला बोलावले, ५ कोटी उकळले...
दरम्यान त्यानंतर पुन्हा कुलकर्णी याने रेड्डी यांना याच हॉटेलमध्ये ७ फेब्रुवारी रोजी भेटायला बोलावले. रेडी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने वेगवेगळ्या भूलथापा रेड्डी यांना दिल्या. "मी जर तुमचे काम केले नाही तर माझ्या नावावर असलेल्या जमिनीचे खरेदीखत मी तुमच्या नावावर करून देईल" असे सांगत त्याने त्याच्या नावावर असलेल्या जमिनीचे बनावट कागदपत्र दाखवले. पेंच व्याघ्र प्रकल्प व बोर व्याघ्र प्रकल्पा जवळील शंभर एकर जमीन शासनाकडून भाडेतत्त्वावर घेतल्याचे बनावट दस्तही त्याने रेड्डी यांना दाखवले. यातून रेडी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून रोख स्वरूपात तसेच त्यांचे नातेवाईक व असोसिएट्स यांच्या बँक खात्यातून ७ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या कालावधीत ५ कोटी ८ लाख १९ हजार ८७६ रुपये रेड्डी यांच्याकडून उकळले..
दरम्यान रेडी यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कुलकर्णी याला पैसे परत मागितले. मात्र घेतलेले पैसे परत देण्यास कुलकर्णी याने नकार दिला. पैसे मागण्याचा तगादा लावल्यास जीवे मारीन अशी धमकीही कुलकर्णी याने दिली.. रेड्डी यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिसांनी कुलकर्णी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे..