मलकापुरात हरियाणा चा ट्रक पकडला! पोलिसांना आढळला भलताच माल;तब्बल ८६ लाखांचा.......
Dec 7, 2024, 20:36 IST
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हरियाणा चा एक ट्रक पोलिसांनी संशयावरून पकडला..त्यात पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आली..हा एकूण मुद्देमाल तब्बल ८६ लाखांच्या घरात आहे...
प्राप्त माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून भुसावळच्या दिशेने एक कंटेनर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर कंटेनर पोलिसांनी अडवले, तेव्हा कंटेनर हरियाणाचे असल्याचे समोर आले. कंटेनर मध्ये असलेल्या मालाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चालकाने उडवा उडवी ची उत्तरे दिली. त्यावेळी पोलिसांनी व्हिडिओ कॅमेऱ्याच्या मदतीने कंटेनर ची तपासणी केली असता त्यात गुटखा आणि तंबाखू आढळून आली. सदर ट्रकचा पंचनामा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात आला. यावेळी कंटेनर मध्ये तब्बल ६३ लाख ३६ हजार रुपयांचा गुटखा सापडला. गुटखा आणि कंटेनर पोलिसांनी जप्त केला असून कंटेनर चालक शहीद रहेमत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश गिरी यांच्या पथकाने केली.