MBBS ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता डिमांड ड्राफ्ट ऐवजी चेकने स्वीकारल्या जाणार प्रवेश शुल्क; ना.प्रतापराव जाधव यांनी केली होती सूचना...
Sep 14, 2024, 16:30 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता डिमांड ड्राफ्ट ऐवजी चेकने देखील शुल्क स्वीकारल्या जाणार आहे. प्रवेश प्रक्रिये दरम्यान सार्वजनिक सुट्ट्या असल्याने चेकने शुल्क स्वीकारल्या जावे अशी सूचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली होती त्यानंतर सीईटी विभागाने या संदर्भाचे पत्रक काढले आहे.
२०२४ -२०२५ या सत्राकरिता आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी द्यावयाच्या शुल्काची रक्कम ही डिमांड ड्राफ्ट द्वारे स्वीकारल्या जाते. मात्र शनिवार, रविवार आणि सण उत्सवांच्या सुट्ट्या आल्यामुळे बँकिंग व्यवहार बंद आहेत.त्यामुळे एमबीबीएस ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डिमांड ड्राफ्ट ऐवजी चेक द्वारे रक्कम स्वीकारण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. आता सीईटी विभागाने तसे पत्रकच काढले आहे.