BIG BREAKING सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट; केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवले..
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन दरवाढीसाठी केलेल्या अन्नत्याग आंदोलनासह वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला मोठी यश मिळाले आहे. केंद्र सरकारकडून रविकांत तुपकर यांची महत्वाची मागणी मान्य करण्यात आली आहे. सोयाबीन दरवाढीसाठी तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली होती, ती मागणी केंद्राने मंजूर केली असून त्यावर थेट ॲक्शन घेत रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क १३.७५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के एवढे केले आहे. त्यामुळे आता सोयाबीनच्या भावात वाढ होणार आहे
सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्कात २० ते ३० टक्क्यांची वाढ करावी ही मागणी रविकांत तुपकर यांनी ११ सप्टेंबरला राज्य सरकार सोबत झालेल्या बैठकीत लावून धरली होती. त्या संदर्भात बैठकीतूनच अजित पवार यांनी सर्वांसमोर दिल्लीला फोन लावला होता. गेल्या वर्षी देखील रविकांत तुपकर यांनी तत्कालीन वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना भेटून ही मागणी लावून धरली होती. नोव्हेंबर मध्ये सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रविकांत तुपकर यांनी हा मुद्दा लावून धरला होता.आता केंद्र सरकारने काल,१३ सप्टेंबरला यासंबंधात शासन निर्णय जारी केला आहे.
कच्च्या खाद्यतेलावर याआधी ५.५ टक्के एवढे आयात शुल्क होते आता ते २७.५ टक्के एवढे करण्यात आले आहे.तर रिफाइंड तेलावरील आयात शुल्क पूर्वीच्या १३.७५ टक्क्यांवरून आता ३५.७५ टक्के एवढे करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे सोयाबीन दरवाढीला काहीअंशी फायदा होणार आहे. रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राजात केलेले अन्नत्याग आंदोलन ,त्यानंतर राज्य सरकार सोबत ची निर्णायक बैठक याचा हा परिणाम मानल्या जातोय.