पालकांनो तुमच्यासाठी खुशबर! आरटीई प्रवेशासाठी मिळाली मुदतवाढ; १ किमी ची अटही केली शिथिल; आता ३ व ५ किमी पर्यंतचे शाळांचे पर्याय...
Mar 17, 2026, 17:04 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिक्षणाच्या हक्क कायद्याअंतर्गत खाजगी विनाअनुदानित शाळांमधील 25 टक्के राखीव प्रवेशासाठी सुरू असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत आता महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची एक किलोमीटरची अट आता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना आता तीन व पाच किलोमीटर पर्यंतच्या शाळांचे पर्याय निवडता येणार आहेत. याशिवाय अर्जामध्ये दुरुस्ती आणि नवीन अर्ज भरण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे, ही मुदतवाढ आता २५ मार्च २०२६ पर्यंत असणार आहे.
यासंदर्भातली माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याआधी १२ फेब्रुवारीला काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पालकांना त्यांच्या निवास स्थानापासून एक किलोमीटर अंतरापर्यंतची शाळाच निवडण्याची अट घालण्यात आली होती. मात्र या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत एक किलोमीटर ची सक्ती योग्य नसल्याचे म्हटले आहे.
जर एखाद्या विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्धच नसेल तर त्या विद्यार्थ्याला अधिक अंतरावरील शाळेत प्रवेश घेण्यापासून रोखणे अन्यायकारक ठरेल असे महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे या नियमांमध्ये सुधारणा करून पालकांना अधिक अंतरावरील शाळांचे पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायालयाने शासनाला दिले.
या आदेशामुळे शिक्षण विभागाने या संदर्भात महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्राधान्याने एक किलोमीटर, त्यानंतर तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतरातील शाळांचे पर्याय पालकांना निवडता येणार आहेत. याशिवाय १६ मार्च पर्यंत ज्या पालकांनी आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांना अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा देखील पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भरलेला अर्ज अनकन्फर्म करून पुन्हा कन्फर्म करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध होणार आहे, न्यायालयाच्या या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.