माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराडांची बुलडाण्यात पत्रकार परिषद! केंद्राच्या अर्थसंकल्पाचे गुणगान गायले; म्हणाले, भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पूर्ण होणार....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १४० कोटी भारतीयांना विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून केंद्र सरकारने यावर्षी ५० लाख ६५ हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी ४७ लाख १६ हजार कोटी रूपयांचा हाच अर्थसंकल्प होता. सन २०१४ मध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी सरकारने हा अर्थ संकल्प सादर केला, तेव्हा साडे सोळा लाख कोटी ना रूपयांची तरतूद होती. आता ३ पटीने वाढ झाली आहे. तसेच - दरवर्षी अपेक्षित उत्पन्नाची वाढ करताना २६ लाख ९६ हजार कोटीची वाढ झाली आहे. - त्यामुळे येत्या २०४७ मध्ये भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकारल्या जाणार आहे, अशी माहिती राज्यसभेचे खासदार माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली..
पत्रकार भवन येथे २३ फेब्रुवारी रोजी दुपारी पत्रकार परीषदेला भाजपाचे लोकसभा प्रमुख माजी आ. विजयराज शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, सचिन देशमुख, लोकसभा समन्वयक मोहन शर्मा, प्रदेश सचिव शालिनी बुंदे, प्रदेशउपाध्यक्ष ओबीसी मोर्चा विश्वनाथ माळी, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील, चंद्रकांत बर्वे, यश संचेती, विनायक भाग्यवंत, रावसाहेब देशपांडे व पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. भागवत कराड यांनी केंद्रिय अर्थसंकल्पा विषयी माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या घोषवाक्याला अनुसरून १४० कोटी भारतीयांसाठी केंद्राचा अर्थसंकल्प सादर करताना अन्नदाता शेतकरी, शेतमजूर, कामगार याशिवाय तरुणांना व्यवसायाची संधी रोजगार उपलब्ध करून देण्या सोबतच उद्योग शिक्षण, रेल्वे या सर्वच क्षेत्रात भरपूर भरीव तरतूद केली आहे. प्रत्येकाला घरे बांधून देण्यासाठी महाराष्ट्रात २२ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी तीन लाख गरजूंना घरकुल मंजूर केले आहे. ग्रामीण व शहरी भागातून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी २ लाख १२ हजार कोटींचे उत्पन्नात वाढ होणार आहे. सर्वसामान्य व्यक्तींना आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या दररोजच्या गरजा पूर्ण करणारा हा विकसित भारताचा अर्थसंकल्प असल्याचेही डॉ.कराड म्हणाले...