माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी काँग्रेस सोडली! खा. मुकुल वासनिकांच्या जवळचे होते अंभोरे; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या बुलढाण्यात गटातटाचा फटका;
नाराज काँग्रेस नेत्यांची पोटदुखी उफाळून आली...
Updated: Feb 25, 2025, 19:11 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काही दिवसांआधी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली. बुलढाण्याच्या मातीतला माणूस राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचतो ही बाब सर्वपक्षीय सर्वसामान्य बुलडाणेकरांसाठी अभिमानास्पद असतांना बुलढाणा जिल्ह्यातील काही काँग्रेसच्या नेत्यांच्या पोटांमध्ये दुखत होते. आता ही पोटदुखी उफाळून आली आहे. काँग्रेसचे तब्बल ७ वर्ष जिल्हाध्यक्ष यासह विविध पदे उपभोगणाऱ्या विजय अंभोरे यांनी आज काँग्रेस पक्षाच्या पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे..विशेष म्हणजे राजीनामा देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राजीनामा देण्याचे कारण त्यांनी सांगितले नाही, मात्र वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत होता. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका गटात मात्र सूतक पडल्याचे दिसत होते. आधीपासून बुलढाणा जिल्हा काँग्रेसमध्ये दोन गट आहेत..दरम्यान आज माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विजय अंभोरे हे खा.मुकुल वासनिकांच्या जवळचे होते. वासनिकांमुळे विजय अंभोरे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. काँग्रेसने देखील आतापर्यंत मोठमोठ्या संघटनात्मक पदांवर अंभोरे यांना बसवले होते...